शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशींच्या ट्रस्टच्या संपत्तीवर बँकेकडून जप्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या शैक्षणिक ट्रस्टची संपत्ती बँकेकडून जप्त करण्यात आली आहे. विविध बँकांचे कर्ज थकवल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्र कडून ही कारवाई करण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रकडून या ट्रस्टची कुर्ला आणि खंडाळा स्थित संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये जमीन आणि दोन इमारतींचा समावेश आहे. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया या दोन बँकांच्या वतीने बँक ऑफ महाराष्ट्र कडून ही कारवाई करण्यात आली आहे.

मनोहर जोशी यांच्या कुटुंबियांद्वारे संचलित कोहिनूर एज्यूकेशन ट्रस्टवर विविध बँकांचे तब्बल ६८ कोटी रुपयांचे कर्ज थकविले आहे. याबाबत बँकेने ट्रस्ट आणि ट्रस्टच्या हमीदारांना दोन महिन्याच्या आत कर्ज भरण्याचे निर्देश दिले आहेत. कोहिनूर एज्यूकेशन ट्रस्टसह हमीदार उन्मेश मनोहर जोशी, माधवी उन्मेश जोशी आणि अनघ जोशी तसेच कॉर्पोरेट गॅरेंटर हॉटेल एयरपोर्ट कोहिनूर आणि कोहिनूर प्लेनट कंस्ट्रक्शन यांना हे निर्देश दिले आहेत. कोहिनूर एज्यूकेशन ट्रस्टवर बँक ऑफ महाराष्ट्रचे १६ कोटी रुपये, स्टेट बँक ऑफ इंडियाचे ३८.६३ कोटी रुपये आणि बँक ऑफ इंडियाचे १३.१८ कोटी रुपयांचे कर्ज आहे.

काय आहे ‘कोहिनूर’ प्रकरण –

नुकतेच दादरमधील कोहिनूर स्क्वेअर हा प्रोजेक्ट देखील माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेश जोशी यांच्या हातून निसटला आहे. ९०० कोटी रुपयांचे कर्ज फेडले नसल्यामुळे उन्मेश जोशी यांनी हा महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट गमावला आहे. दादरमधील एका आर्किटेक कंपनीने कोहिनूर स्क्वेअऱचे काम हाती घेतले असून येत्या १५ ते १८ महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

उन्मेश जोशी यांनी प्रभादेवी येथील शिवसेना भवनासमोर कोहिनूर स्क्वेअर हा प्रोजेक्ट सुरु केला. परंतु गेल्या दोन वर्षांपासून या प्रोजेक्टचे काम बंद होते. उन्मेश जोशी यांनी ९०० कोटी रुपयांचे कर्ज थकवले. त्यामुळे संबधित बॅंकानी नॅशनल कंपनी लॉ ट्रिबुनलकडे दाद मागितली. ट्रिबुनलने याप्रकरणी निकाल दिल्यानंतर जोशी यांना हा प्रकल्प सोडावा लागला आहे.