भाजपच्या कारभाराला वैतागले पुणेकर ; आता नवी बॅनरबाजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणेकरांनी पोस्टरबाजीचा सपाटाच लावला आहे. यापूर्वी ‘गिरीश काय रे …’? च्या बॅनरबाजीवरून खळबळ माजली होती. आता पुन्हा एकदा एक नवीन बॅनर शहरभरात झळकत आहे. या नव्या बॅनर मधून सत्ताधारी भाजपाला निशाणा बनवण्यात आले आहे. पुणेकरांनी आपल्या अनोख्या शैलीत सत्ताधारी भाजपने पुण्याची वाट लावल्याचं म्हटलं आहे. मात्र हे बॅनर कुणी लावले आहेत हे अद्याप कळू शकले नाही.

नक्की काय आहे बॅनर ?

‘गल्ली ते दिल्ली तुमचा थाट,
शंभर नगरसेवक आमदार आठ,
पुण्याच्या पाण्याची लावली वाट’

अशी चारोळी पाण्याच्या समस्येवरुन पुणेकरांनी भाजपला लक्ष्य केले. पुण्यातील मुख्य चौकांमध्ये असे बॅनर लावण्यात आले आहेत. बॅनरच्या माध्यामातून पुणेकरांनी आपला राग व्यक्त केला आहे. तुमच्या कारभाराला पुणेकर वैतागले असल्याचंही या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे.

पुण्यात पाणीसंकट दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात अघोषित पाणीकपात लागू करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील दोन पंप बंद केले आहेत. हे पंप बंद केल्याने पुण्याच्या दररोजच्या पाण्यात अडीचशे एमएलडी इतकी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे शहरातील अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा झाला आहे.

खडकवासला धरण समुहातील धरणांमधे कमी पाणी शिल्लक असल्याने हे पाणी पुणे शहराला पिण्यासाठी आणि ग्रामीण भागाला शेती आणि पिण्यासाठी पुरवून वापरायचे असेल तर पुण्यात पाणीकपात करणं आवश्यक आहे, असं पालिकेने म्हटलं आहे.

‘शिवडे आय एम सॉरी…!’ ‘स्मार्ट बायका कुठे जातात’ ? “गिरीष काय रे ? नंतर पुण्याच्या पाण्याची लावली वाट’

यापूर्वी पुणे शहरात ‘शिवडे आय एम सॉरी…!’ अशा स्वरूपाचे होर्डिंग लावण्यात आले होते. त्याची चर्चा देखील आख्या शहरभर झाली होती. एवढेच नव्हे ‘शिवडे आय एम सॉरी…!’ चे होर्डिंग लिहीणाऱ्या त्या महाभागाला पोलिसांनी शोधून काढले होते. त्यानंतर ‘स्मार्ट बायका कुठे जातात’ ? पिंपरी चिंचवडमध्ये अशा स्वरूपाच्या पोस्टरने खळबळ माजवली होती. पिंपरी शहरातील आकुर्डी ते चिखली या मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर हे फ्लेक्स लावण्यात आले होते. त्यानंतर आता “गिरीष काय रे ? च्या या बॅनर ने पुण्यात एकच खळबळ माजवली होती. यापूर्वीचे पोस्टर सामान्य व्यक्तीशी निगडीत होते मात्र आता यात राजकीय व्यक्तींची नावे असल्यामुळे याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात देखील केली जात आहे. आता ऐण निवडणुकीच्या तोंडावर भाजपाविरोधात बॅनरबाजी सुरु आहे.