वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन निवेदन सादर
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Bapu Pathare MLA | वडगावशेरी मतदारसंघातील निरगुडी व वडगाव शिंदे या गावात असलेल्या वनविभागाच्या जागेत उच्च दर्जाचे वन उद्यान उभारावे, अशी मागणी आमदार बापूसाहेब पठारे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली. मुंबई येथे (ता. २३) पठारे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन त्यासंबंधी निवेदन दिले.
निरगुडी व वडगाव शिंदे गावात वन विभागाच्या जवळपास २२९ हेक्टर जागेत वन उद्यान उभारण्याच्या संदर्भाने विस्तृत चर्चा यावेळी पार पडली. “मौजे निरगुडी येथील गट क्र. ५३, १३६ व १६३-अ मध्ये वनविभागाची २२९ हेक्टर जागा आहे. सदर जागा वन उद्यानासाठी वापरात आल्यास नागरिकांना चांगला फायदा होईल. झपाट्याने वाढत्या लोकसंख्येचा तसेच वाढत्या तापमानचा विचार करता वन उद्याने उभी राहणे सर्वच बाजूंनी खूप गरजेचे आहे. पर्यावरणाचा समतोल राखणे ही आपले कर्तव्य आहे आणि त्याच दृष्टीतून सदर वनविभागाच्या जागेत वन उद्यान विकसित व्हावे”, असे मत बापूसाहेब पठारे यांनी मांडले आहे.
यापूर्वीही पठारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. त्यावर पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे समजते. गणेश नाईक यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरात लवकर हे वन उद्यान उभारण्याच्या संदर्भात सकारात्मकता दाखवली असल्याचे सांगण्यात आले आहे.