‘बिल्डर’नं फसवलंय ? ‘इथं’ मिळणार एकदम मोफत कायदेशीर मदत, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बिल्डरकडून फसवणूक झालेल्या ग्राहकांना वकीलांनी दिलासा दिला आहे. महारेरा अंतर्गत नोंदणी केलेल्या ग्राहकांची बिल्डरकडून फसवणूक झाली असल्यास 1 फेब्रुवारीपासून मोफत कायदेशीर सल्ला देणे आणि त्यांचा खटला विनामोबदला लढवण्याचे वकील संघटनांकडून जाहीर करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईतील ग्राहकांना निशुल्क कायदेशीर मदत केली जाणार असून त्यानंतर राज्यातील इतर शहरात देखील हा उपक्रम राबवला जाणार आहे.

बार असोसिएशन या वकिलांच्या संघटनेकडून रेरा कायदा 2016 आणि महारेरा कायद्याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. बिल्डरकडून फसवणूक झालेल्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. महारेरामधील प्रलंबित खटल्यांची संख्या वाढली आहे. गृहनिर्माण क्षेत्रातील ही कोंडी फोडण्यासाठी बार असोसिएशने पुढाकार घेतला आहे. मोफत कायदेशीर सल्ला विभागाकडून ग्राहकांना विनामोबदला कायदेशीर सल्ला दिला जाईल असे बार असोसिएशनचे सचिव अनिल डिसुझा यांनी सांगितले. ज्यांनी वकिलांची फी देणं परडवत नाही अशा फसवणूक झालेल्या ग्राहकांना निशुल्क सल्ला दिला जाईल. वेळेप्रसंगी त्यांचा खटला देखील लढला जाईल असे डिसुझा म्हणाले. यासाठी 15 ते 20 वकीलांची निवड करण्यात आली आहे. याची माहिती बार असोसिएशन वेबसाइटवर देखील प्रकाशित करेल किंवा महारेरा वेबसाइटवर ती उपलब्ध करुन दिली जाईल असे ही डिसुझा म्हणाले.

महारेरामध्ये खटला दाखल करण्यासाठी ग्राहकांना 5 हजार रुपये शुल्क भरावे लागते. तसेच तक्रार निवारणाचा पर्याय स्वीकारल्यास ग्राहकाला 1 हजार रुपये भरावे लागतील. ग्राहकांची घर खरेदी करताना अनेकदा फसवणूक होते. जेव्हा प्रत्यक्षात घराचा ताबा मिळतो तेव्हा ग्राहकाला आपली फसवणूक झाल्याची जाणीव होते तेव्हा ते बिल्डर विरोधात तक्रार करतात. परंतु अपुरी माहिती सादर केल्याने आणि कायद्याची माहिती नसल्याने त्यांना न्याय मिळत नसल्याचे बार असोसिएशनच्या निदर्शनास आले. त्यामुळे खटला रखडतो असे डिसुझा म्हणाले.

बिल्डर विरोधात तक्रारीत वाढ 
महारेरा अंतर्गत सर्वाधिक 23 हजार 795 गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. यापैकी महारेरा मध्ये 9 हजार 490 खटले दाखल झाले त्यापैकी 7000 खटले निकाली निघाले आहेत. बहुतांश वेळा ग्राहक स्वत:हून खटला दाखल करतात ही चांगली बाब आहे. परंतू पुराव्यांचे योग्य सादरीकरण करु न शकल्याने त्यांना न्याय मिळत नाही असे ही डिसुझा म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा –