बारामती : पाण्यात बुडून 2 मुलींचा दुर्दैवी मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शेतात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्या मुलींचा तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात लोणी भापकर येथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे बारामतीसह जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तन्वी रोहिदास होळकर (वय 12) आणि समिक्षा युवराज भोसले (वय 12) अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. याप्रकरणी तन्वी हिचे वडिल रोहिदास होळकर यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तन्वी व समिक्षा शिंदेमळा येथील एका परिसरात राहण्यास होत्या. शनिवारी त्यांची शाळा अर्धवेळ होती. दुपारी शाळा सुटल्यानंतर त्या दोघीही शेळ्या चारण्यासाठी शेतात गेल्या होत्या. सायंकाळी शेळ्या होळकर यांच्या घरी आल्या. पण, मुली परत आल्या नाहीत. त्यामुळे कुटूंबिय तसेच स्थानिक नागरिकांनी मुलींचा शोध घेण्यास सुरूवात केली. यावेळी शेताजवळच असणार्‍या तळ्याजवळ मुलींच्या चप्पल आढळून आल्या. त्यामुळे नागरिकांनी तळ्यात मुलींचा शोध घेतला. त्यावेळी दोन्ही मुलींचे मृतदेह तेथे आढळून आले. तळ्याचे नुकतेच काम करण्यात आले आहे. त्याची खोली वाढविण्यात आली आहे. तळेही पाण्याने भरलेले आहे. मुली पाय घसरून पडल्या असाव्यात, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

You might also like