बारामतीत 30 लाखाचा गुटखा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतच साठवणूक करून ठेवलेला गुटखा पकडला असून, पुणे ग्रामीण पोलीसांच्या पथकाने तबल 30 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. नुकतीच ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे. स्वतः उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार राज्यभर कारवाई करण्याच्या सूचना देत असताना बारामतीमधूनच गुटखा जिल्ह्यात पुरवला जात असल्याचे समोर आले आहे.

संतोष लक्ष्मण गायकवाड (रा वसंतनगर, बारामती, जि पुणे) याला ताब्यात घेतले आहे. तर हरी दगडू नवले (रा शिक्षक सोसायटी, कसबा, बारामती, जि पुणे) याचा शोध घेण्यात येत आहेत. त्यांच्या विरोधात
बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

पोलिसांनी येथून छोटा विमल, xxx, कारगिल, RMD हा गुटखा पकडला आहे. जिल्ह्यात अवैध धंदे तेजीत सुरू असल्याचे गेल्या काही कारवाइतून समोर आले आहे. मटका, जुगार, गुटखा, वाळू माफिया अशा कारवाई सुरू आहेत.

दरम्यान, बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक जयंत मीना यांना गोपनीय माहिती मिळाली की संतोष गायकवाड आणि हरी नवले हे बारामती शहरामध्ये गुटख्याचा साठा करून बारामती शहर व आजूबाजूच्या परिसरामध्ये तसेच खेड्यापाड्यात विक्री करत आहेत. त्यानुसार या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर बारामती गुन्हे शाखेचे चंद्रशेखर यादव व त्यांच्या पथकाने शहरातील कसबा आणि वसंतनगर भागात जाऊन गोपनीय रित्या माहिती घेतली. तसेच गोडाऊनवर अचानक छापा टाकला. त्यात हरी नवले हा बेकायदेशीररित्या गुटखा साठवून विक्री करण्याचे उद्देशाने मिळून आला. त्याने गुटखा संतोष गायकवाड याचा असल्याचे सांगितले.