बारामती : तिसरी देखील मुलगीच झाल्यानंतर जन्मदात्या आईनं सव्वा महिन्याच्या चिमुरडीला पाण्याच्या टाकीत बुडवून मारलं, महिलेला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील बारामती तालुक्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, तिसरी देखील मुलगी झाल्याने जन्मदात्या आईनेच सव्वा महिन्याच्या चिमुरडीला पाण्याच्या टाकीत बुडवून ठार मारले आहे. येथील माळेगाव बुद्रुक गावात हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी दिपाली संजय झगडे (रा. मालेगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपाली झगडे ही दोन महिन्यांपूर्वी माहेरी बाळंतपणासाठी गेली होती. सव्वा महिन्यापूर्वी तिला मुलगी झाली होती. दीपाली यांना या आधीही दोन मुली होत्या. तिसरीही मुलगीच झाल्याने ती नैराश्यात गेली होती.

यातूनच तिने 25 नोव्हेंबर रोजी सव्वा महिन्याच्या आपल्या चिमुरडीला पाण्याच्या टाक्यात टाकले. दरम्यान चिमुकली अचानक गायब झाल्याचा कांगावा दिपाली हिने केला होता. घराच्या जवळच असलेल्या पाण्याच्या टाकीत हा मृतदेह आढळून आल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती.

तपासादरम्यान पोलिसांना हा खून घरातल्याच कोणीतरी केला असावा असा संशय होता. या चिमुरडीचा मृत्यू झाल्यानंतर तिची आई रुग्णालयात ॲडमिट झाली होती. त्यामुळे पोलिसांचा दिपाली वरील संशय बळावला. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली. तिने खून केल्याची कबुली दिली. सलग तिसरीही मुलगीच झाल्याने आणि वंशाला दिवा पाहिजे या हट्टापायी तिने हे कृत्य केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिला या गुन्ह्यात अटक केली आहे. अधिक तपास बारामती पोलीस करत आहेत.

You might also like