कोरोना काळात बारामती अ‍ॅग्रोने जपली सामाजिक बांधिलकी ! राज्यासाठी 500 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर आरोग्यमंत्री टोपे यांच्याकडे सुपूर्द

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  आपल्या यशस्वी उद्योजकतेलाच समाजकार्याची जोड देऊन सामाजिक बांधिलकी जपण्यातील सातत्य सीईओ व आ. रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो लिमीटेडने कायम राखलेले आहे. याच दृष्टीकोनातून कोरोनाच्या या संकटमय परिस्थितीतही बारामती अ‍ॅग्रो लिमीटेडकडून हा पायंडा सुरुच आहे. याचाच एक भाग म्हणून आ. रोहित पवारांतर्फे बारामती अ‍ॅग्रोच्या माध्यमातून संपूर्ण राज्यासाठी ५०० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपकरणे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे आज मंगळवारी मुंबई येथे सुपूर्द करण्यात आली.

नाविन्यपूर्ण व प्रभावी उपाययोजनांद्वारे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आ.रोहित पवार सतत कार्यरत आहेत. मात्र हे प्रय़त्न केवळ आपल्या कर्जत जामखेड मतदारसंघापुरतेच मर्यादित न ठेवता राज्यस्तरावरही आ. रोहित पवार विविध प्रयत्न करत आहेत. सद्य परिस्थितीत रुग्णांचा वाढता आकडा आणि निर्माण झालेला ऑक्सीजनचा तुटवडा लक्षात घेऊन बारामती अ‍ॅग्रोचे सीईओ व आ. रोहित पवार यांच्यातर्फे सामाजिक बांधिलकीतून बारामती अ‍ॅग्रोच्या माध्यमातून ५०० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपकरणे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मुंबई येथे सुपूर्द करण्यात आली. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये पुरवण्यात येणा-या या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरमुळे सद्या कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने आवश्यक असणारी ऑक्सीजनची काही प्रमाणात गरज भागवण्यास मोठी मदत होणार आहे. कोरोनाच्या या संकटमय परिस्थितीत आ. रोहित पवारांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे राज्यातील सर्वसामान्य नागिरकांना दिलासा मिळणार आहे. नुकतीच कर्जत जामखेडसाठी १२० व अहमदनगर जिल्ह्यासीठी ३९ ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर बारामती अॅग्रोचे सीईओ व आ. रोहित पवार यांच्यातर्फे सामाजिक बांधिलकीतून बारामती अ‍ॅग्रोच्या माध्यमातून देण्यात आली आहेत.

कोरोनाबाधित रुग्णासाठी सुरुवातीच्या काळात ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ हे उपकरण प्रभावी ठरते. या साधनात इलेक्ट्रिक प्रणालीवर हवा आणि पाण्याद्वारे ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. एकावेळी पाच लिटर ऑक्सिजन सांभाळण्याची क्षमता असल्याने याचा चांगला लाभ गरज असलेल्या कोरोना रुग्णांना होणार आहे. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे व आ. रोहित पवार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

राज्यात विविध ठिकाणांसाठी ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर-

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाण या सर्वांना अनुसरून राज्यातील विविध भागात ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ देण्यात येत आहेत. यामध्ये प्रत्येकी, अमरावती विभाग – १५, औरंगाबाद विभाग- २८, कोंकण विभाग- २४, नागपूर विभाग- १८, नाशिक विभाग- २१, पुणे विभाग- ४४, तर अहमदनगरसाठी- २०० ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात येत आहेत. तर मुंबई महानगरपालिका- ५१, भिवंडी निजामपूर महानगरपालिका- १, नागपूर महानगरपालिका- २०, पुणे महानगरपालिका- २७, ठाणे महानगरपालिका- ८, नाशिक महानगरपालिका-१०, पिंपरी चिंचवड महानगरपालिका- १०, औरंगाबाद महानगरपालिका- ६, वसई विरार शहर महानगरपालिका- ४, नवी मुंबई महानगरपालिका- ६, कल्याण डोंबिवली महानगरपालिका- ७ असे ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात येत आहेत.

प्रत्येक संकटात बारामती अ‍ॅग्रो मदतीसाठी तत्पर…

राज्यासह देशावर जेव्हा जेव्हा आपत्ती आली त्या त्या वेळेस एक सामाजिक दातृत्वाची जबाबदारी समजून विविध मदतींद्वारे सामाजिक बांधिलकी जपण्यास बारामती अ‍ॅग्रोचे सीईओ व आ. रोहित पवार यांची बारामती अ‍ॅग्रो लिमीटेड कटीबध्द राहिलेली आहे. प्रत्येक संकटाच्या काळात बारामती अ‍ॅग्रो लिमीटेडने सहकार्याची भूमिका बजावलेली आहे. महाराष्ट्रातील नाशिक, कन्नड, नारायणपूर, बारामती येथील शासकीय रूग्णालयांसह पुण्यातील ससून रुग्णालयाला वेळवेळी सिरींज पंप, बेबी वॉर्मर, रुग्णवाहिका, सक्शन मशीन, व्हिल चेअर, वॉटर कुलर यासारखी वैद्यकीय मदत करण्यात आली आहे.

मागच्या काही वर्षातील दुष्काळात मराठवाड्यासह इतर दुष्काळी भागातील तालुक्यांमध्ये स्वच्छ पाणी पुरवठा केला आणि चारा छावण्या उभारण्यात आल्या होत्या. तसेच सांगली व कोल्हापूर महापूराच्या वेळेस शालेय विर्थ्यांसाठी शाळेची दप्तरे तर पूरग्रस्तांसाठी अन्नधान्यासह वैद्यकीय मदत पुरवण्यात आली.

कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर महाराष्ट्राच्या सुरक्षेचे कवच म्हणून जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, यासह सर्व फ्रंटलाईन वर्कसना सॅनिटायझरसह, इतर आवश्यक वस्तू देण्यात आल्या. तर याच कोरोना काळात पंढरपूर येथे झालेल्या अतिवृष्टीत पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंसह कोरोनाच्या बचावासाठी सेफ्टी किट पुरवण्यात आले. उत्तराखंड येथे २०१३ मध्ये ढगफुटी झाल्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत कपडे व घरगुती जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. तसेच पुण्याच्या शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट वसाहतीला लागलेल्या आगीच्या वेळेस तेथील बाधित नागरिकांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. प्रत्येक संकटात आ. रोहित पवार यांची बारामती अ‍ॅग्रो आधारासाठी कायम पुढे सरसावली आहे.

राज्यातील ऑक्सीजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कार्यरत आहे. दरम्यान एक लोकप्रतिनिधी म्हणून इतर उपाययोजनांद्वारे राज्यातील ऑक्सीजनचा तुटवडा भरून काढण्याच्या दृष्टीकोनातून बारामती अ‍ॅग्रोच्या माध्यमातून ही सामाजिक बांधिलकी जपत या सकंटमय परिस्थितीत ५०० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आसल्याचे बारामती अ‍ॅग्रो लिमीटेडचे सीईओ आ. रोहित पवार यांनी सांगितले.