बारामती : पाच कृषी अधिका-यांवर गुन्हा दाखल

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन

कन्स्ट्रक्शन कंपनीने निविदा भरली नसताना देखील कंपनीला स्वत: च्या फायद्यासाठी काम देऊन पदाचा गैरवार केल्याप्रकरणी कृषी खात्यातील पाच अधिका-यांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभाने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद पर्वतराव परजणे (वय-६०), बारामती तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार नारायण बरकडे (वय-५०), बारामती मंडळ कृषी अधिकारी पोपट शंकर ठोंबरे (वय-५७), कृषी पर्यवेक्षक शाहूराज हरिश्चंद्र मोरे (वय-४३), कृषी सहाय्यक विजय किसन चांदगुडे (वय-५५) अशी गुन्हा दाखल झालेल्या अधिका-यांची नावे आहेत. तर संतोषकुमार बरकडे, पोपट ठोंबरे, शाहूराज मोरे आणि विजय चांदगुडे यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

लाचलुचपत प्रतिबंध विभागाने दिलेल्या फिर्य़ादेनुसार, २०१५-१६ मध्ये बारामती तालुक्यातील मौजे जळगाव येथील ग्रामस्थांसाठी नाला बांधकामासाठी खासदार निधी मंजूर झाला होता. या बांधकामाची निवीदा मे सिद्धांत कन्स्ट्रक्शन यांनी भरली नसताना देखील त्यांना काम देण्यात आले. कंपनीने निविदा भरलेली नसताना देखील अधिका-यांनी पदाचा दुरुपयोग केला असल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे केली होती.

मौजे जळगाव येथील सिमेंट नाला बांधकामासाठी खासदार निधी मंजूर झाला होता. मंजूर करण्यात आलेल्या सिमेंट नाला बांधकामातील निविदा प्रक्रीया पुर्ण करताना तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद परजणे, तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे, कृषी अिकारी पोपट ठोंबरे, कृषी पर्यवेक्षक शाहूराज मोरे व कृषी सहायक विजय चांदगुडे यांनी अधिकाराचा व पदाचा दुरुपयोग केला. आपल्या पदाचा गैरवापर करुन पुर्वी दिलेल्या कॉन्ट्रक्टरने मुदतीत काम पुर्ण केली नाहीत म्हणून ते काम सिद्धांत कन्स्ट्रक्शन यांनी निविदा भरलेली नसताना देखील स्वत:च्या फायद्यासाठी काम करण्याचे आदेश काढले. तसेच सिद्धांत कन्स्ट्रक्शनकडून अनामत रक्कम व अतिरिक्त सुरक्षा ठेव भरुन घेतल्या नाहीत. अशाप्रकारे अधिका-यांनी आपल्या नियंत्रणात असलेल्या शासकीय रक्कमेचा व पदाचा दुरुपयोग करुन सिद्धांत कन्स्ट्रक्शनचे शिवाजी एकनाथ भोंडवे यांना बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करुन कामे दिली. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने या प्रकरणाची चौकशी करुन बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.