बारामतीच्या भूमि अभिलेख कार्यालयातील अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन

बारामतीच्या भुमिअभिलेख कार्यालयातील अधिकार्‍याला 10 हजार रूपयाची लाच घेताना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई गुरूवारी सकाळी करण्यात आली.

आमिन जहांगीर तडवी (44, रा. एस.बी. पार्क सोसायटी, टिंगरे नगर, धानोरी) असे 10 हजाराची लाच घेणार्‍या अधिकार्‍याचे नाव आहे. याप्रकरणी 29 वर्षीय व्यक्‍तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. लाच घेणारे आमिन तडवी हे बारामती येथील उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात निमतानदार म्हणून नोकरीला आहेत. तक्रारदार यांच्या मौजे पारवडी (ता. बारामती) येथील जमीनीचे मोजणीपत्र देण्यासाठी आमिन तडवी यांनी त्यांच्याकडे दहा हजाराच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली. एसीबीच्या अधिकार्‍यांनी तक्रारीची पडताळणी केली. एसीबीच्या पथकाने गुरूवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बारामती येथील इंदापूर रोडवरील नवीन प्रशासकीय इमारतीच्या तळ मजल्यावरील पार्किंगमध्ये सापळा रचला. आमिन तडवी यांनी तक्रारदाराकडून 10 हजाराची लाच स्विकारल्यानंतर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस अधिक्षक संदीप दिवाण, उपाधिक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रकांत चौधरी आणि त्यांच्या पथकाने केली आहे. अधिक तपास एसीबीचे अधिकारी करीत आहेत.