मी बारामती जिंकून दाखवेल : गिरीश महाजन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पक्षाने जबाबदारी माझ्याकडे द्यावी, माझ्याकडे स्किल आहे, बारामती जिंकून दाखवेल, असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. मंत्री गिरीश महाजन एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

आज अशक्य काहीच नाही. कुणाची मक्तेदारी कुठेच नाही. आम्ही ज्या ठिकाणी काहीच नव्हतो, त्या ठिकाणी सत्ता प्राप्त केली आहे, असेही महाजन म्हणाले. अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यावर लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. केंद्र आणि राज्य सरकारवर विश्वास आहे. अनेक ठिकाणी आमच्याकडे काही नसतानाही जागा आता वाढल्या, असं त्यांनी सांगितलं. नगरची जबाबदारी माझ्याकडे नव्हती. नगर माझ्याकडे असते तर ५० नगरसेवक आले असते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाजन यांनी यावेळी बारामतीत आपण कमळ फुलवू शकतो, यावर विश्वास व्यक्त केला. तसंच पक्षाने बारामतीची जबाबदारी माझ्याकडे द्यावी. तिथे उमेदवार जिंकून आणण्याचे माझ्याकडे स्किल आहे, मी बारामती जिंकून दाखवेल,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर विरोधकांनी भाजपला मुलं पळवणारी टोळी म्हणून संबोधित केले. त्यावर महाजनांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. आता मुलंच नाही तर नातवंडही पळवणार आहोत. त्यांची मुलं नातवंडे ते सांभाळू शकत नाहीत का ? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसंच विरोधकांनी यावर आत्मपरिक्षण करावं, असा सल्ला त्यांनी दिला. तसंच काही पक्षात आमचं घर म्हणजेच आमचा पक्ष असे समीकरण आहे. कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्या उचलायचं काम करायचं का ?, असा टोलाही त्यांनी लगावला.

ह्याही बातम्या वाचा –  

पुण्यात छऱ्याच्या बंदुकीतून मित्रावर गोळीबार 

दारु पिण्याच्या वादातून खडकी बाजारमध्ये खुन 

अमेरिकेतील अभियंत्याने लग्नाच्या अमिषाने महिलेला घातला १७ लाखाचा गंडा