भाजपा उमेदवार कांचन कुल यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर : ‘त्या’ युवकाविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बारामती लोकसभा मतदार संघातील भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्याबाबत मोबाईल व्हाटस्अ‍ॅप स्टेटसवर अश्‍लील व आक्षेपार्ह, बदनामीकारक मजकूर ठेवून तो इतर व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर व्हायरल केल्याप्रकरणी भिगवण पोलिस ठाण्यात एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिगवण पोलिस ठाण्यात ज्ञानदेव नारायण ताकवणे (रा. पारगाव, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली असुन याप्रकरणी सागर पंजाब बागल (21, रा. पिंपळे, ता. इंदापूर) याच्याविरूध्द माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम (आयटी अ‍ॅक्ट) 67 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने सायंकाळी कांचन कुल यांच्याबद्दल व्हॉटस् अ‍ॅप स्टेट्सवर अश्‍लील व आक्षेपार्ह मजकूर ठेवला आणि तो त्याने इतर मित्रांना तसेच इतर व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर व्हायरल केला. भाजपचे तालुका अध्यक्ष नानासाहेब शेंडे आणि उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर मारकर यांच्या ही बाबत लक्षात आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. सोमवारी रात्री उशिरा आरोपीविरूध्द भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा अधिक तपास भिगवण पोलिस करीत आहेत.