‘विकासाच्या मुद्द्यावर बोलायला जागा नसल्याने विरोधकांना जेलच्या धमक्या’

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – विकासाच्या मुद्द्यावर बोलायचे सोडून हे सरकार सातत्याने विरोधकांना धमक्या देत आहे हे दुर्दैवी असून विकासाच्या मुद्द्यावर बोलायला जागा नसल्यानेच अश्या धमक्या दिल्या जात आहेत अशी टीका बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधानांच्या कालच्या विधानावर केली.

आज दौंड तालुक्यातील खडकी येथे प्रचार दौऱ्यादरम्यान बोलत होत्या. यावेळी त्यांच्या सोबत दौंडचे माजी आमदार रमेश थोरात, विकासआबा ताकवणे, दौंड राष्ट्रवादीचे अध्यक्ष अप्पासो पवार, वीरधवलबाबा जगदाळे, वैशाली नागवडे, काँग्रेसचे पोपटभाई ताकवणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना पाच वर्षे या सरकारला जेल नाही सुचली आणि आता निवडणुका आल्यानंतर यांना जेल सुचतेय, हे सरकार प्रत्येक बाबतीत अपयशी ठरले आहे त्यामुळे आता यांना बोलण्यास कुठलाच मुद्दा सापडत नाही त्यामुळे काहीतरी बोलून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो. तुमची सत्ता आहे म्हणून तुम्ही काहीही कराल असे वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे असे म्हणत तुम्ही आम्हाला भीती दाखवत असाल किंवा धमकी देत असाल तर अश्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही असा प्रखर हल्ला खासदार सुप्रिया सुळेंनी पंतप्रधानांच्या कालच्या विधानावर चढवला.

दौंड तालुक्यामध्ये आज दिवसभर सुळे यांचा दौरा सुरू असून आज गुरुवारी सायंकाळी सहा वाजता दौंड शहरामध्ये त्यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.