खळबळजनक ! बारामतीमध्ये खरेदी-विक्री संघाच्या माजी संचालकानं केला वडिलांचा गोळया झाडून खून

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन –  बारामती तालुका आज गोळीबाराच्या घटनेमुळे हादरून गेला आहे. बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे येथे मुलानेच गोळ्या झाडून आपल्या जन्मदात्या पित्याचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शेतजमीन आणि संपत्तीच्या वादातून पोटच्या मुलाने आपल्या वडिलांवर गोळ्या झाडून नंतर स्वत:वर गोळ्या घालून घेतल्या आहेत.

बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे येथील धनंजय धोंडिबा खोमणे (वय-75) यांच्यावर मुलगा दिपक खोमणे याने जमीनीच्या वादातून धनंजय खोमणे यांच्या गोळ्या झाडल्या. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. वडिलांवर गोळ्या झाडल्यानंतर दिपक यांनी स्वत:वर गोळ्या झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. दिपक आणि त्यांच्या वडिलांमध्ये अनेक वर्षापासून जमीनीचा वाद सुरु होता. अनेकांनी हा वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी देखील केली होती. मात्र, दोघांमध्ये समेट घडवून आणण्यात मध्यस्थांना यश आले नाही.

याच वादातून आज सकाळी दिपक खोमणे याने वडिल धनंजय खोमणे यांच्यावर रिवॉल्व्हरमधून गोळ्या घातल्या. त्यानंतर त्याने स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या. यामध्ये वडिलांचा जागीच मृत्यू झाला. तर दिपक याच्यावर बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. दिपक हा बारामती तालुका खरेदी विक्री संघाचा माजी व्हाईस चेअरमन आणि विद्यमान सदस्य म्हणून पदावर आहे.