5 नगरसेवकांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, शिवसेनेला धक्का

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात शिवसेनेसोबत सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी कुरकुर सुरुच आहे. राज्यात सत्ता येण्यापूर्वी पारनेरला शिवसेना व राष्ट्रवादीचे जुगाड जमवून नगरपंचायतीत सत्ता आली होती. आता पुढील निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले आहेत. त्यामुळे पारनेर शहरात राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांचे वर्चस्व वाढले असून शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांना मोठा धक्का मानला जात आहे.

पारनेर नगरपंचायतमधील शिवसेनेला धक्का बसला असून शिवसेनेचे 5 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या उपस्थिती राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी पारनेरचे आमदार नीलेश लंके हे देखील उपस्थित होते. यावेळी नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या सर्वांनी आज दुपारी बारामतीला जाऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

नगराध्यक्षांविरुद्धचा रोष असे प्रथमदर्शनी कारण सांगितले जात आहे. मात्र, येत्या काही महिन्यात नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. त्यासाठी आमदार लंके यांनी तयारी सुरु केल्याचे सांगण्यात येत आहे. पारनेर नगराध्यक्ष पदावरून गेले काही दिवस नगरसेवक व माजी आमदार विजय औटी यांच्यात तणाव निर्माण झाला होता. औटी आमदार असताना तेथील नगरपंचायत त्यांच्या ताब्यात आली होती. त्यावेळी लंकेही शिवसेनेत होते. नंतर औटी व लंके यांच्यात अंतर पडत गेले. शेवटी लंके यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत औटी यांचा पराभव करून ते निवडून आले.