परळीत राबवणार बारामती पॅटर्न, झोपडपट्टीमुक्त शहर करण्यासाठी धनंजय मुंडेंचा निर्धार

परळी : पोलीसनामा ऑनलाइन – परळी नगर परिषदेने आयोजित केलेल्या प्रधानमंत्री आवास योजना, पंतप्रधान पथविके्रता आत्मनिर्भर स्वनिधी योजनेचे धनादेश वाटप बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंडे यांनी परळीत बारामती पॅटर्न राबवण्यात येणार असून येत्या काळात शहर झोपडपट्टीमुक्त केले जाईल, असा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमाला आमदार संजय दौंड, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, परळी न.पा.च्या नगराध्यक्षा सरोजनीताई हालगे, उपनगराध्यक्ष सकिल कुरेशी, वाल्मिक कराड, बाजीराव धर्माधिकारी, दीपक देशमुख, मुख्याधिकारी अरविंद मुंडे आदी उपस्थित होते.

शहर झोपडपट्टीमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करताना धनंजय मुंडे म्हणाले की, परळी शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी परळीत बारामती पॅटर्न राबवून सर्वांसाठी घरे योजनेतून 6 हजार घरकुले बांधण्याचा माझा संकल्प आहे. निवडणुकीत दिलेल्या प्रत्येक वचनावर मी ठाम आहे. या अश्वासनाची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील आहे. परळी शहराच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न शासनाच्या विविध विकास योजनेच्या माध्यमातून साकार करणार आहे. तसेच परळी शहराला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र हौसिंग डेव्हलपमेंट कार्पोरेशनद्वारे परळी शहरात साडेपाच हजार घरकुले बांधून देण्याचा प्रकल्प राबवला जाईल. नगर परिषद परळी वैजनाथ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना राबवली जात आहे. आर्थिक दुर्बल घटकांना वैयक्तिक स्वरुपातील घरकूल बांधण्यासाठी दोन सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर असून लाभार्थ्यांची एकूण संख्या 1357 झाली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांस दोन लाख पन्नास हजार अनुदान मंजूर आहे. काही लाभार्थ्यांना पहिला हप्ता 40 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप केले आहे.

पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी योजनेच्या कामाची माहिती देताना धनंजय मुंडे म्हणाले की, पथविक्रेत्यासांठी सुक्ष्म पतपुरवठा योजनेसाठी 668 अर्ज आले आहेत. त्यापैकी 640 अर्जास मान्यता दिली आहे. 33 लाभार्थ्यांना प्रत्येकी 10 हजार रुपये अनुदानाच्या धनादेशाचे वाटप केले आहे.