बारामती सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – बारामती सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बद्रीनारायण आरबाड यांच्या पत्नीने लेखी पत्राद्वारे कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत आपल्या पतीविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी विनंती मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती प्रदीप नंदराजोग यांच्याकडे केली आहे.

बारामती दिवाणी न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांकडे तसेच पोलीस ठाण्यात तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याची व्यथा न्यायाधीशांच्या पत्नीने आपल्या अर्जात केली आहे. तेव्हा आता या तक्रारीची दखल घेऊन आपल्याला न्याय द्यावा, अशी विनंती त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे केली आहे.

आरबाड यांच्या पत्नीने मुख्य न्यायमूर्तींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की बारामती दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश बद्रीनारायण आरबाड यांचा १२ वर्षापूर्वी बाळासाहेब जावळे यांच्या कन्येशी विवाह झाला. लग्नात ५ लाख रुपये, फर्निचर आणि विवाहाचा खर्च मुलीकडून करण्यात आला. त्यानंतरही वर्षभरातच बद्रीनारायण यांचा हव्यास वाढला. गावातील ३० एकर शेतजमीन आणि गाडीसाठी त्यांनी पत्नीकडे मागणी करण्यास सुरुवात केली. व त्यांचा छळ सुरु केला. २००८ मध्ये पत्नीच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांची जमीन आपल्या नावावर करुन देण्यासाठी ते मागे लागले. शेतजमीन नावावर करुन देत नाही तोपर्यंत त्यांनी पत्नीला घरात येण्यास मनाई करुन तिला मारहाण करुन घराबाहेर काढले.

याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र, तेथेच न थांबता न्यायाधीशांनी २०१२ मध्ये घटस्फोटासाठी कोर्टात दावा दाखल केला. स्थानिक कौटुंबिक न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला व पोटगीची रक्कम म्हणून पत्नीला दरमहा १० हजार रुपये देण्याचा आदेश २०१६ मध्ये देण्यात आला. मात्र, गेल्या तीन वर्षात त्यांनी फक्त २ लाख रुपये पत्नीला दिले आहेत.

उर्वरित रक्कम देण्यासही न्यायाधीश टाळाटाळ करीत आहे. यासंबंधी न्यायालयात त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे. ती अजूनही प्रलंबित आहे, अशी व्यथा न्यायाधीशांच्या पत्नीने लेखी पत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना कळविले आहे. आता मुख्य न्यायमूर्ती त्यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –