‘भाजपचे लोक आपले लोक’ असं ‘बारामती’करांना वाटायला हवं : चंद्रकांत पाटील

पुणे/बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – बारामती लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. लोकसभा आणि विधानसभेला नेहमी असं झालं की, दरवेळी कोणीतरी नवीन माणूस दिला गेला. निवडणूक आल्यावरच प्रयत्न झाले, सातत्याने पाच वर्ष प्रयत्न केले तरच चांगला निकाल मिळतो. भाजपचे लोक आपले लोक आहेत, असे बारामतीकारांना वाटले पाहिजेत. यासाठी लोकांची कामे करा असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

बारामती येथील भाजप संपर्क कार्य़ालयाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुढील पाच वर्षे सातत्याने लोकांची कामे करता यावेत, काम करण्याची रचना करता यावी, यासाठी बारामतीमध्ये कार्यालय सुरु करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अनेक लोकांना जोडून आपल्याला पुढे जायचे आहे. कार्यकर्त्यांनी लोकांची कामे करून त्यांना आपल्याशी जोडले पाहिजे असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

प्रत्येक निवडणुकीत बारामतीमध्ये परिवर्तन घडेल असे वाटत होते. मात्र, तसे काही घडले नाही. यापुढील प्रत्येक निवडणुक भाजप ताकदीने लढवेल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. छोट्या निवडणूकीमधूनच माणसे जोडली जातात. माणसे जोडत आपल्याला पुढे जायचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. लोकसभेच्या निकालाच्या वेळी स्वत: शरद पवार यांनाही सुप्रिया सुळे विजयी होतील याची खात्री नव्हती. अशी लढत भाजपने लोकसभेच्यावेळी दिल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.