मावळात रंगणार बारणे-पवार यांच्यात लढत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पक्षाने आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली. काल भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये १६ उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली. आज शिवसेनेने आपली पहिला यादी जाहीर केली आहे. यामध्ये मावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेनेने विद्यमान खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्यावरच विश्वास दाखवून त्यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीने अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदार संघात बारणे विरुद्ध पवार असा थेट सामना रंगणार आहे.

मावळ लोकसभा मतदार संघातून पार्थ पवार यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात येत होता. त्यामुळे मावळातून शिवसेना कोणाला उमेदवारी देते याची उत्सुकता लागून राहीली होती. अखेर श्रीरंग बारणे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्यात यश मिळवले आहे.

२०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवणारे श्रीरंग बारणे यांनी दीड लाखांच्या मताधीक्याने विजय मिळवला होता. या निवडणूकीत बारणे यांनी शेकापचे उमेदवार आणि विद्यमान भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचा १ लाख ५७ हजार ३९७ मतांनी पराभव केला होता. श्रीरंग बारणे यांना ५ लाख १२ हजार २२६ मते मिळाली होती तर जगताप यांना ३ लाख ५४ हजार ८२९ मते मिळाली होती.

सतराव्या लोकसभा निवडणूकीत मावळ मतदार संघातून राष्ट्रवादीने अजित पवार यांच्या मुलाला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनला आहे. पार्थ पवार यांना विजयी करण्यासाठी पवार कुटुंबीयांनी मावळात प्रचाराला सुरुवात केली आहे. शिवसेनेने बारणे यांना उमेदवारी दिल्याने पार्थ पवार यांच्यासमोर तगडे आव्हान आहे. शिवसेनेचे मुरब्बी राजकारणी असलेले श्रीरंग बारणे यांना नवखे पार्थ पवार कशा प्रकारे टक्कर देतात याची उत्सुकता आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like