लग्न समारंभात घेऊन जाण्याच्या बहाण्यानं पतीनं केली पत्नीची निर्घृण ‘हत्या’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लग्नाच्या कार्यक्रमात हजेरी लावण्याच्या बहाण्याने एका पतीने पहिल्यांदा माहेरी राहत असलेल्या त्याच्या पत्नीला सोबत नेले. त्यानंतर खून करून मृतदेहाला गंगापूरमध्ये फेकले आणि तेथून फरार झाला. मृतदेहाची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. मृत महिलेच्या आईने पतीवर हुंड्याबद्दल छळ केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान पोलीस आरोपी पती आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा शोध घेत आहेत.

सोमवारी रात्री उशीरा गंगापूरमधील बालाजी मंदिरासमोरील गल्लीत एका महिलेचा मृतदेह आढळला. घटनास्थळाजवळून जाणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच सीओ तृतीय श्वेता यादव यांच्यासह पोलिस दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. मृत महिला प्रेम नगर धोबी चौकातील रहिवासी असून निशा असे नाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. निशाच्या आई लक्ष्मी यांनी सांगितले की त्यांनी तीन वर्षांपूर्वी आपल्या मुलीचे लग्न गंगापूर हनुमान मंदिराजवळ राहणाऱ्या लखनशी केले होते.

त्यांनी सांगितले की लग्नानंतर सासरच्यांनी मुलीचा हुंड्यासाठी छळ करण्यास सुरूवात केली, यामुळे मुलगी गेल्या एका महिन्यापासून माहेरीच राहत होती. सोमवारी निशा आपल्या आई लक्ष्मीसोबत माधव बारी येथील एका संबंधितांकडे लग्नाच्या कार्यक्रमात आली होती. त्याच वेळी, आरोपी पतीने लग्न समारंभातच तिला अनेक वेळा घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने नकार दिला.

असा आरोप केला जात आहे की त्यानंतर लखनने तिला जबरदस्तीने काही काळासाठी घेऊन जाण्याचा आग्रह धरला आणि त्यानंतर ती त्याच्याबरोबर निघून गेली. जवळपास सव्वा अकराच्या सुमारास निशाचा मृतदेह बालाजी मंदिरासमोरील एका गल्लीत पडलेला आढळला. पोलिसांना निशाच्या गळ्यावर नखांच्या खुणा आढळल्या. दरम्यान आरोपी पती लखन आणि इतर सासरचे लोक घटनास्थळावरून फरार झाले असल्याचे समोर आले. पोलीस त्यांच्या शोधात आहेत. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी लखनच्या घरावर छापा टाकला आणि घटनास्थळावरून सर्व लोक फरार असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांना त्यांच्या घरात हीटर जळत असल्याचे आढळले आणि वस्तू विखुरलेल्या अवस्थेत आढळल्या. मृत महिलेच्या आईने लखनवर तस्करी केल्याचा आरोपही केला आहे.

You might also like