मुलींच्या होस्टेलमध्ये लागली आग, MBBS पास ‘इंटर्न’ विद्यार्थीनी जिवंत जळाली, झाला मृत्यू

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था : उत्तरप्रदेश च्या बरेली मध्ये एक मोठी घटना घडली आहे. येथील मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात आग लागल्यामुळे संशयास्पद परिस्थितीत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थीनी सुकिर्ती शर्मा एमबीबीएस केल्यानंतर वसतिगृहातच रहात होती आणि मेडिकल कॉलेजमध्ये ती इंटर्न होती. ही घटना भोजीपुरा पोलीस स्टेशन परिसरातील एसआरएमएस मेडिकल कॉलेजची आहे. घटनेचे कारण अजून तरी समजू शकले नाही. या घटनेबाबत मुलीच्या घरातील सदस्यांना माहिती देण्यात आली असून घटनेनंतर पोलिस व प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून कारवाई सुरु आहे.

पटना येथील रहिवासी होती सुकीर्ती

मिळालेल्या माहितीनुसार एसआरएमएस मेडिकल कॉलेजच्या पीजी हॉस्टेलमध्ये अचानक आग लागली. खोलीमधून धूर बाहेर येत असता गार्ड आणि वॉर्डन यांनी महाविद्यालय प्रशासनाला लगेच माहिती दिली. नंतर अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलावण्यात आले परंतु जेव्हा आग विझली तोपर्यंत विद्यार्थिनीचा जळून मृत्यू झाला होता. बिहारच्या पटना येथे राहणाऱ्या सुकीर्ती शर्मा एसआरएमएस मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होती. ती पीजी हॉस्टेलच्या रूम क्रमांक ३२० मध्ये राहत होती. कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ. एस बी सिंह यांचे म्हणणे आहे की खोलीत एक हीटर लावलेला होता, त्यामुळे ही आग भडकली. सकाळी सकाळी जेव्हा वसतिगृहाच्या खोलीतून धूर बाहेर येऊ लागला तेव्हा घटनेबाबत समजले.

अग्निशमन दलाला माहिती देण्यास केला उशीर

या घटनेची माहिती महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला देण्यात आली. अग्निशमन विभागाला माहिती देण्यापूर्वी महाविद्यालय व्यवस्थापनाने स्वत:च्या उपकरणांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला गेला. यानंतर भोजीपुरा पोलिस आणि अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलावले होते. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले परंतु तोपर्यंत विद्यार्थिनीचा जळून मृत्यू झाला होता. या प्रकरणाबाबत माहिती मिळताच एसएसपी शैलेश पांडे आणि डॉ. संसार सिंह, भोजीपुराचे निरीक्षक मनोजकुमार त्यागी घटनास्थळी पोहोचले.

बेडच्या खाली लावले होते हीटर : कॉलेज व्यवस्थापन

डॉक्टर संसार सिंह यांनी सांगितले की, विद्यार्थिनी सुकीर्ती शर्मा यांनी एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण केले होते. एमबीबीएस केल्यानंतर ती इंटर्न करत होती. ती सिंगल बेडरूममध्ये रहात होती. तिच्या पलंगाखाली तिने एक हीटर लावले होते. महाविद्यालय व्यवस्थापन सांगत आहे की रूम हीटरमुळे ही आग लागली होती. संपूर्ण खोली जळून खाक झाली होती. दारे आणि खिडक्याही जळाल्या आहेत. विद्यार्थिनींचे संपूर्ण शरीर जळून गेले आहे. सीएफओ आणि सीओ नबावगंज या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृतदेहास पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात येत आहे.

फेसबुक पेज लाईक करा –