चिअर्स ! थर्टी फर्स्टसह ‘या’ 2 दिवशी पहाटेपर्यंत बार खुले राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ख्रिसमस आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मद्यपानाने करण्याचा प्रघात आता सर्वत्र रुढ होऊ पहात आहे. महसुल मिळविण्यासाठी आता शासनानेही त्याचा गेल्या काही वर्षांपासून प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. यंदा २४ डिसेंबर, २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत तुम्हाला उत्सव साजरा करता येणार आहे. मध्यरात्री एक वाजेपर्यंत दारुची दुकाने उघडी ठेवण्यास तर, पहाटे पाचपर्यंत हॉटेलमध्ये मद्य पुरविता येणार आहे. यासंबंधीचा आदेश उत्पादन शुल्क खात्याने काढला आहे.

२४, २५ आणि ३१ डिसेंबर रोजी दारु दुकाने, बिअर शॉपी मध्यरात्री १ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचवेळी परमिट रुम, क्लब, बिअर बार यांना मद्य पुरविण्यास पहाटे ५ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षात ख्रिसमस आणि नववर्षाचे स्वागत मद्यपानाने करण्याचा जणू प्रघात पडला आहे. अट्टल दारुबाज बनणारे अनेक तरुणतरुणी नववर्षाच्या स्वागत समारंभात आयुष्यातील पहिला पेग घेत असल्याचे आजवर करण्यात आलेल्या पाहणीत आढळून आले. असे असले तरी यानिमित्ताने अधिक महसुल मिळविण्याच्या दृष्टीने गेल्या काही वर्षापासून शासनाने रात्री उशिरापर्यंत दारु दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. त्याचा अस्सल मद्यप्रेमी अधिकाधिक लाभ उठविताना दिसतो.