अवकाशयानाच्या बॅटऱ्या आता ई-वाहनांना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अवकाशयानात वापरण्यात येणारी बॅटरी ई -वाहनांमध्ये वापरली जाऊ शकते. त्यासाठी अवकाशयानात वापरण्यात येणारी उच्च क्षमतेची बॅटरी लवकरच कमी किमतीत बाजारात उपलब्ध होणार आहे. त्यादृष्टीने  इस्रो’ने (भारतीय अवकाश संशोधन संस्था) प्रयत्न सुरु केले आहेत.

आवकाशयानात वापरण्यात येणारी उच्च क्षमतेची बॅटरी वाहनात वापरता येईल का, यासाठी एआरएआय (अ‍ॅटोमोटीव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडया) या संस्थेने ‘इस्रो’ सोबत संयुक्तपणे संशोधन केले. या संशोधनात या प्रकारच्या बॅटरी वाहनांमध्ये वापरता येणे शक्य असल्याचे समोर आले. मात्र, हे संशोधन झाले असले, तरी या बॅटरी निर्मितीचा खर्च खूप मोठा आहे. या प्रकारच्या बॅटरी एवढ्या मोठ्या प्रमाणात या पूर्वी कधीच बनविल्या गेल्या नाहीत. त्यामुळे ‘इस्रो’ ने या बॅटरीची निर्मिती कमी खर्चात करता येईल का, यासाठी संशोधन सुरू केले. ‘इस्रो’ने आपल्या पातळीवर संशोधन पूर्ण केले आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच ‘इस्रो’ने तंत्रज्ञान हस्तांतरणाची निविदा काढली. काही नामांकित कंपन्यांनी ही निविदा भरली असून कमी किंमतीत या बॅटरी निर्माण करण्याची तयारी दर्शविली आहे.’

‘एआरएआय’चे वरिष्ठ उपसंचालक एम. आर. सराफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अवकाशयानामध्ये सुपर कपॅसिटर असणाऱ्या लिथियम बॅटरीचा वापर केला जातो. या बॅटरीची क्षमता खूप मोठी असते. तसेच तिचे आयुर्मानही जास्त असते. या प्रकारच्या बॅटरी ई-वाहनांमध्ये वापरल्यास त्याचा मोठा फायदा होणार आहे. त्यासाठीचे संशोधन पूर्ण झाले आहे. मात्र, त्या स्वस्त पद्धतीने उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘इस्रो’चे प्रयत्न सुरू असून लवकरच त्या स्वस्त किंमतीत बाजारात उपलब्ध होतील.’

वाढते शहरीकरण, औद्योगिकरणामुळे दिवसागणिक रस्त्यावर वाढणारी वाहनांची संख्या अन् त्यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या समस्या हे एक दुष्टचक्र आहे. त्यावर इलेक्ट्रिक वाहन हा नवीन उपाय पुढे आला आहे. इलेक्ट्रिक वाहने बनवण्यासाठी जवळपास सर्वच कंपन्या सरसावल्या आहेत. विजेवर चालणारी वाहने यामध्ये नवनवीन तंत्रज्ञान शोधले जात आहेत.