‘प्रत्येकालाचं वाटतं आपल्या घरात शिवराय जन्मावेत, त्यासाठी जिजामातेचाही जन्म आवश्यक’

पुणे (बिबवेवाडी) : पोलीसनामा ऑनलाइन – बिबवेवाडी येथील स्वामी विवेकानंद रस्त्यावरील महेश सोसायटी चौकामध्ये स्थानिक नगरसेविका रुपाली दिनेश धाडवे यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून साकारलेल्या ‘बेटी बचावो, बेटी पढाओ ’ या शील्पाचे अनावरण महिला दिनी अर्थात ८ मार्चला महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ, माजी नगरसेवक दिनेश उर्फ पिंटू धाडवे, माजी स्वीकृत सदस्य मनोज देशपांडे, श्रीकांत गायकवाड यांच्यासह मोठ्या प्रमाणावर नागरिक, विशेषत: महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नगरसेविका रुपाली धाडवे यांनी समाजप्रबोधनपर उभारलेले हे शिल्प निश्‍चितच प्रेरणादायी ठरेल. आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या, की मुलीही सर्व क्षेत्रात पुढे आहेत. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नये. रुपाली धाडवे यांनी काळाची गरज ओळखून समयोचित संदेश देणारे शिल्प उभारले आहे.

प्रास्ताविक करताना नगरसेविका रुपाली धाडवे म्हणाल्या, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला हा संदेश बेटी बचाओ आणि बेटी पढाओ हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रतिकात्मक शिल्प उभारले आहे. प्रत्येकाला वाटते आपल्या घरात शिवराय जन्मावेत. परंतू शिवराज जन्माला घालण्यासाठी जिजामातेचा जन्म झाला पाहीजे. परंतू आजच्या काळात स्त्री समानतेच्या मोठ्या गप्पा मारल्या जात असल्यातरी स्त्रियांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. विशेषत: आजही घराण्याचा दिवा म्हणून मुलगाच पाहीजे, असा हट्ट धरून स्त्री भ्रूण हत्या केली जाते. परंतू मुलीच्या रुपातील पणतीही संपुर्ण घर उजळू शकते, हे आज अनेक क्षेत्रात पाहायला मिळते. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि सर्वच क्षेत्रात महिलांनाही सन्मान मिळायला हवा.