BCCI कडून CEO राहुल जोहरींचा राजीनामा मंजूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांचा राजीनामा स्वीकारला आहे. जोहरी यांनी काही महिन्यांपूर्वी बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याकडे राजीनामा दिला होता. जोहरी यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपणार होता. तथापि, मंडळाने त्याला अंतरिम मुदतवाढ देण्याचा निर्णयही घेतला होता.

जोहरी यांची 2016 मध्ये बीसीसीआयच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राजीनाम्यावर निर्णय घेता आला नव्हता. परंतु आता त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली आहे.

जोहरी यांच्या राजीनाम्यानंतर बीसीसीआयचं मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद रिक्त झाले आहे. त्या जागी नव्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याची नियुक्ती केली जाईल अथवा नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर प्रशासक (सीओए) नेमण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर संतोष रांगणेकर यांनीदेखील पदाचा राजीनामा दिली होता. त्यानंतर बीसीसीआयने मुख्य वित्तीय अधिकार्‍याशिवाय काम सुरू ठेवले आहे.