BCCI कडून ग्रीन सिग्नल : भारतीय क्रिकेट संघ ऑलम्पिक स्पर्धेत खेळणार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भारतीय क्रिकेट जगतातून मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI ) एक मोठा निर्णय घेतला आहे. ऑलम्पिक परिषदेने जर क्रिकेटचा ऑलम्पिक स्पर्धेत समावेश केला तर 2028 मध्ये लॉस अँजलिसमध्ये होणा-या ऑलम्पिक स्पर्धेत भारताचे महिला आणि पुरुष दोन्ही संघ पाठविण्यात येतील असा निर्णय BCCI ने घेतला आहे. त्यामुळे ऑलम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाबाबत BCCI ने आता एक पाऊल पुढे टाकले आहे.

एवढेच नाही, तर 2022 साली बर्मिंघममध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचा महिला क्रिकेट संघ सहभागी होणार आहे. तसेच यंदा ( 2021) मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असल्याचीही घोषणा केली आहे. नुकतेच BCCI आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाची व्हिडिओ कॉन्फरिन्सिंगद्वारे बैठक झाली. बैठकीत भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेटचा ऑलम्पिकमध्ये समावेश झाला तर 2028 मध्ये लॉस अँजलिस ऑलम्पिकमध्ये महिला आणि पुरूष असे दोन्ही भारतीय संघ स्पर्धेत सहभाग होतील अशी माहिती BCCI च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला दिली आहे.