WTC Final : जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनलसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर, ‘या’ खेळाडूंना संधी नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएसामने अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्यानंतर भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केले आहे. भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. कोरोनाचे नियम व 14 दिवसांचा क्वारंटाईन लक्षात घेता जूनच्या पहिल्याच आठवड्यात भारतीय संघ इंग्लंडला रवाना होणार आहे. भारतीय संघ 18 ते 23 जून या कालावधीत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझिलंडचा सामना करेल. त्यानंतर इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका खेळेल. चार महिन्यांच्या या दौऱ्यासाठी बीसीसीआयने आज (शुक्रवार) टीम इंडियाची घोषणा केली आहे.

या संघात एक मोठा बदल करण्यात आला असून अष्टपैलू हार्दिक पांड्याला या संघातून वगळण्यात आले आहे. हार्दिक पांड्या अद्याप पूर्णपणे तंदरुस्त नसल्याने तो गोलंदाजी करु शकणार नाही. त्यामुळे त्याची निवड करण्यात आली नाही. तर पृथ्वी शॉ याची निवड न करणे हे आश्चर्यकारक आहे. कारण पृथ्वी शॉने विजय हजारे ट्रॉफिच्या एका पर्वात 800 हून अधिक धावा केल्या आहेत. याशिवाय आयपीएलमध्ये त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. तरी देखील त्याची निवड करण्यात आलेली नाही. आज जाहीर करण्यात आलेल्या संघात हार्दिक, पृथ्वी, भुवनेश्वर कुमार व कुलदीप यादव यांची निवड करण्यात आलेली नाही.

भारताच्या कर्णधारपदी विराट कोहली आणि उपकर्णधारपदी अजिंक्य रहाणे आहेत. भारताच्या सलामीसाठी रोहित शर्मा, शुभमन गिल आणि मयांक अगरवाल यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर भारताच्या मधल्या फळीसाठी चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, लोकेश राहुल यांचे स्थान कायम आहे. लोकेश राहुल जर पूर्णपणे फिट असेल तरच त्याला संधी देण्यात येणार आहे. तो जर फिट नसेल तर त्याच्या जागी अन्य खेळाडूची निवड केली जाऊ शकते.

भारतीय संघ

विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव. लोकेश राहुल व वृद्धीमान सहा यांची निवड फेटनेस टेस्टनंतर करण्यात येईल.

राखीव खेळाडू

अभिमन्यू इस्वरण, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला

भारतीय संघाचा इंग्लंड दौरा

18 ते 23 जून – भारत विरुद्ध न्यूझीलंड (जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल)

भारत वि. इंग्लंड कसोटी मालिका

4 ते 8 ऑग्सट – पहिली कसोटी
12 ते 16 ऑगस्ट – दुसरी कसोटी
25 ते 29 ऑगस्ट – तिसरी कसोटी
2 ते 6 सप्टेंबर – चौथी कसोटी
10 ते 14 सप्टेंबर – पाचवी कसोटी