IPL 2022 च्या हंगामात 10 संघ एकमेकांना भिडणार, BCCI च्या बैठकित निर्णय

अहमदाबाद : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाची (BCCI) 89 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) गुरुवारी (दि.24) अहमदाबादमध्ये झाली. या बैठकीमध्ये आयपीएलमध्ये (IPL) खेळवल्या जाणाऱ्या टीमबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. IPL 2022 मध्ये दोन नव्या टीमच्या समावेशावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे 2022 च्या आयपीएलमध्ये 10 संघ एकमेकांशी भिडताना पहायला मिळतील.

आयपीएलमध्ये दोन नव्या संघासाठी अदानी ग्रुप आणि गोएंका हे शर्यतीत आहेत. अदानी ग्रुप व संजिव गोएंका ग्रुप आयपीएलचा नवा संघ खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत. यापैकी एक संघ हा अहमदाबादचा असेल आणि तो अदानी ग्रुप खरेदी करण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या संघासाठी कानपूर, लखनौ आणि पुणे यांच्या नावाची चर्चा आहे. संजिव गोएंका ग्रुपने 2016 आणि 2017 मध्ये झालेल्या आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघ मैदानावर उतरवला होता. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार 2022 च्या आयपीएलमध्ये दोन नव्या संघांच्या समावेशावर सर्व सदस्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.

एकूण 94 सामने होणार
आयपीएल 2022 च्या मोसमात 10 संघ एकमेकांमध्ये भिडणार आहेत. त्यामुळे एकूण 94 सामने होतील आणि त्यामुळे स्पर्धेचा कालावधीही वाढेल. तसेच क्रिकेटच्या ऑलिम्पिक समावेशाबाबतही BCCI ने सकारात्मकता दर्शवली आहे. मात्र, त्यांनी ICC कडून काही मुद्यांवर स्पष्ट मत मागितले आहे.