Ind Vs Aus : भारतीय खेळाडुंना करावी लागताहेत टॉयलेट साफ

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी आणि शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी ब्रिस्बेनला पोहचली असून त्यांना ज्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यात कोणतीही रुम सर्व्हिस दिली जात नाही. त्यामुळे भारतीय खेळाडुंना स्वत:चे बेड स्वत:च तयार करावे लागत असून टॉयलेटही स्वत:च साफ करावे लागत आहे.

सिडनी कसोटी बरोबरीत सोडविण्यानंतर भारतीय संघ मंगळवारी दुपारी ब्रिस्बेनला पोहचला. त्यांना गाबा स्टेडियमपासून ४ किमी अंतरावर असलेल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, या हॉटेलमध्ये कोणतीही रुम सर्व्हिस देण्यात येत नाही.

भारतीय संघाबरोबर प्रवास करणार्‍या एका सदस्याने सांगितले की, आम्ही हॉटेलमध्ये कैद आहोत. आम्हाला स्वत:लाच आमचा बेड आवरावा लागतो आहे. स्वत:लाच टॉयलेट साफ करावे लागत आहे. हॉटेलमध्ये आम्ही ज्या मजल्यावर रहात आहोत. त्या मजल्यावरही फिरायला परवानगी नाही. संपूर्ण हॉटेल रिकामे आहे. तरीही आम्हाला स्विमिंग पुल आणि जीमचा वापर करण्याची परवानगी नाही. हॉटेलचे सगळे कॅफे आणि रेस्टॉरंट बंद आहेत.

दौर्‍याआधी एकदा अनिवार्य क्वारंटाईन पूर्ण झाले की खेळाडुंना सर्व गोष्टी सोप्या होतील, असे सांगितले गेले होते. मग खेळाडुंना गरजेच्या गोष्टी का दिल्या जात नाही, असे खेळाडु व सपोर्ट स्टाफचा प्रश्न आहे. याबाबत बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी संपर्क साधला असल्याचे सांगण्यात येत आहे. जर ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात आला तर बीसीसीआय अशी वागणूक त्यांना देते का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.