IPL 2020 वर ‘कोरोना’ व्हायरसचं संकट कायम, बोर्डाच्या महत्वाच्या सदस्याची Covid-19 ची टेस्ट पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सिजनवरील कोरोनाचं सावट कमी होताना दिसत नाही. सध्या युएई मध्ये असलेल्या BCCI च्या मेडिकल टीमच्या एका सदस्याचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. याआधी चेन्नई सुपर किंग्जच्या 2 खेळाडू आणि 11 टीम सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. बेंगलोर मध्ये असलेल्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीच्या दोन सदस्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.

एएनआयच्या अहवालानुसार, BCCI च्या मेडिकल टीमच्या एका सदस्याने आपल्या सहकार्याचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती दिली आहे. ते म्हणाले, “हे खरं आहे की आमच्या एका सहकाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे पण त्यांच्यामध्ये कोणतेही कोरोनाचे लक्षण आढळले नाही. पण सुरक्षेच्या दृष्टीने पॉझिटीव्ह व्यक्तीला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.”

29 ऑगस्टला बीसीसीआयने दोन खेळाडूसह सीएसकेच्या 13 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. चेन्नई सुपर किंग्जच्या मॅनेजरने दावा केला आहे की त्या सर्व सदस्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. 14 दिवसांचा क्वारन्टीन पूर्ण करून ते सर्व सदस्य टीममध्ये सहभागी होऊ शकतील.

शेड्युल मध्ये उशीर

कोरोना विषाणूच्या संक्रमाणामुळे चेन्नई सुपर किंग्जच्या संपूर्ण टीमचा क्वारन्टीन पिरियड वाढवण्यात आला आहे. सर्व खेळाडूंचे तीन कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर सीएसके टीम 4 सप्टेंबर पासून मैदानावर सराव सुरु करू शकते.

कोरोना संक्रमाणामुळे 13व्या सिजनचे शेड्युल सुरु होण्यास उशीर झाला आहे. बीसीसीआय शुक्रवारी आयपीएलचं शेड्युल जाहीर करू शकते. इंडियन प्रीमियर लीगचं आयोजन 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत केलं जाणार आहे.