‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी रोहित शर्मा तर ‘अर्जुन’ पुरस्कारासाठी इशांत आणि धवनची BCCI कडून शिफारस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी बीबीसीआयने भारताचा धडाकेबाज सलामीवीर आणि उपकर्णधार रोहित शर्माच्या नावाची शिफारस केली आहे. त्याचबरोबर भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. भारताची महिला क्रिकेटपटू दिप्ती शर्माचेही बीबीसीआयने अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. भारताच्या क्रीडा मंत्रालयाने 2020 या वर्षातील विविध पुरस्कारांसाठी क्रीडा संघटनेला शिफारस करण्यास सांगितले होते. त्यानुसार चार क्रिकेटपटूंची शिफारस बीबीसीआयने केली आहे. याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली म्हणाले, सध्याच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्माने आपला ठसा उमटवला आहे. त्याच्यासारखी कामगिरी कोणालाही करता आलेली नाही.

आमच्याकडे काही पर्याय उपलब्ध होते. पण खेलरत्न पुरस्कारासाठी आम्ही रोहित शर्माचे नाव सुचवले आहे. ईशांत शर्मा हा बऱ्याच काळापासून भारतीय क्रिकेटची सेवा करत आहे. सध्याच्या घडीला तो भारतीय संघातील वरीष्ठ वेगवान गोलंदाज आहे. त्याच्याबरोबर सलामीवीर शिखर धवनने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. महिलांच्या क्रिकेटमध्ये दिप्ती शर्माने नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. त्यामुळेच या तिन्ही क्रिकेटपटूंची आम्ही अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. रोहित शर्माच्या नावावर बरेच विक्रम आहेत. आतापर्य़ंत वनडे क्रिकेटमध्ये तब्बल तीन वेळा द्विशतके झळकावण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे.

त्याचबरोबर गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा त्याच्याच नावावर होत्या. रोहितने गेल्या विश्वचषकाच्या सामन्यात धावांची टांकसाळच उघडली होती. वनडे आणि टी-20 सामन्यांमध्ये रोहितने आतापर्यंत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. एक कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये सर्वाधिक जेतेपदे रोहितच्या नावावर आहेत. सलामीवीर धवनने आतापर्य़ंत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. रोहितबरोबर त्याने बऱ्याचदा भारताला दणदणीत सुरुवात करून दिली आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघात सर्वाधिक सामने खेळणारा वेगवाग गोलंदाज हा इशांत शर्मा आहे. भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर जेव्हा गेला होता तेव्हा इशांत फॉर्मात होता. गेली काही वर्षे तो सातत्याने चांगली गोलंदाजी करत आहे.