‘या’ कारणामुळे सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण यांना बीसीसीआयची नोटीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना बीसीसीआयचे नवनियुक्त लोकपाल डी. के. जैन यांनी हितसंबंधांसंदर्भात नोटीस बजावली आहे. बीसीसीआय’च्या क्रिकेट सल्लागार समितीवर कार्यरत असलेले हे दोघे इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) मार्गदर्शक म्हणूनसुद्धा कार्यरत असल्यामुळे त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. २८ एप्रिलपर्यंत लेखी उत्तर देण्याचे आदेश सचिन आणि लक्ष्मण यांना देण्यात आले आहेत. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजीव गुप्ता यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.

माझ्याकडे ‘बीसीसीआय’च्या नियमावली अंतर्गत कलम ३९ अन्वये तक्रार आली आहे. यानुसार घटनेच्या आधारे हितसंबंधांचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्हाला २८ एप्रिलपर्यंत लिखित उत्तर देणे बंधनकारक आहे. याची प्रत ‘बीसीसीआय’कडेही बाजू मांडण्यास पाठवण्यात आली आहे. असे जैन यांनी सचिन आणि लक्ष्मणला पाठवलेल्या नोटिशीत म्हंटले आहे.

काय आहे प्रकरण –

जस्टीस लोढा समितीच्या शिफारशीनुसार बीसीसीआयच्या प्रशासनात दुहेरी हितसंबंधांना मनाई करण्यात आली आहे. सचिन तेंडुलकर हा आयपीएलमधल्या मुंबई इंडियन्सचा, तर व्हीव्हीएस लक्ष्मण हा सनरायझर्स हैदराबादचा मार्गदर्शक म्हणून सक्रिय आहेत. याआधी सौरव गांगुलीलाही अशीच नोटीस बजावण्यात आली होती. तो बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष, क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य आणि दिल्ली कॅपिटल्स या आयपीएल संघाचा सल्लागार आहे, त्यामुळे त्याला चौकशीला बोलावण्यात आले होते. सचिन आणि व्हीव्हीएस हेदेखील बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य आहेत, म्हणून त्यांना देखील नोटीस पाठवली आहे.