सौरभ गांगुलीनं ममता सरकारची जमीन केली परत, ‘दादा’ भाजपात एन्ट्री करणार ?

पोलीसनामा ऑनलाईन टीम : पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. बंगालच्या भाजप मुख्यमंत्रीपदासाठी लोकप्रिय चेहर्‍याच्या शोधात आहे. अशातच बीसीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरभ गांगुली भाजपमध्ये प्रवेश करण्याची अटकळ बांधली जात आहे. ममता सरकारने बंगालच्या न्यू टाऊनमध्ये आयसीएससी बोर्डाच्या बारावीपर्यंतच्या शाळेसाठी गांगुली यांना जमीन दिली होती.

परंतु नुकतेच त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली आणि शाळेसाठी दिलेली दोन एकर जमीन परत केली आहे. भाजपमध्ये जाणार असल्याने गांगुली यांनी हा निर्णय घेतल्याची अटकळ बांधली जात आहे. परंतु गांगुली मला राजकारणात रस नाही, असे म्हटले आहे. दरम्यान, सौरभ गांगुली आणि ममता बॅनर्जी यांचे राजकीय संबंध उत्तम आहे.

गांगुली यांना क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष बनवण्यामागे ममता बॅनर्जी यांचा हातभार होता. इतकंच नाही बीसीसीआयचे अध्यक्ष बनल्यानंतर सौरभ गांगुली यांचे गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतचे संबंध चांगले झाले आहेत. ऑक्टोबर 2019 मध्ये सौरभ गांगुली यांना बीसीसीआयचे अध्यक्ष बनवण्यात गृहमंत्री अमित शाह यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.