अर्जुन पुरस्कारासाठी (BCCI) कडून ‘या’ खेळाडूंची शिफारस

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने आज म्हणजेच शनिवारी गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यासह चार खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. यंदा BCCI कडून अर्जुन पुरस्कारासाठी महिला क्रिकेटपटू पूनम यादव आणि भारताच्या वर्ल्डकप संघातील सदस्य रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह त्यांच्या नावाची शिफारस केली आहे.

आतापर्यंत ५३ क्रिकेटपटूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. १९६१ साली सलीम दुराणी यांना पहिल्यांदा अर्जुन पुरस्कार देण्यात आला. २०१८ साली महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाला अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता. ज्येष्ठतेच्या निकषावर अर्जुन पुरस्कारासाठी खेळाडूंची निवड करण्यात येते.

मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह
इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बीसीसीआयने नुकताच संघ जाहीर केला. त्यात अनपेक्षितपणे जडेजाच्या नावाचा समावेश करण्यात आला. शमी आणि बुमराह हे भारताचे प्रमुख गोलंदाज आहेत. या दोघांनी मागील काही वर्षांत परदेशात आपल्या भेदक माऱ्याने प्रतिस्पर्धींना हतबल केले आहे. बुमराहने अल्पावधीतच भारतीय संघात आपले स्थान निर्माण केले. बुमराहने ४९ वन डे सामन्यांत ८५ बळी टिपले आहेत. शमीनेही ६३ वन डे सामन्यांत ११३ बळी टिपण्याचे रेकॉर्ड नावावर केले आहे.

पुनम यादव
पुनम यादवने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजब कामगिरी केली आहे. तिने गोलंदाजीसोबत फलंदाजीमध्येही उत्तम योगदान दिले आहे. इंग्लडविरूद्ध झालेल्या एकदिवसीय आणि टी-20 सामन्यात यादवने चांगली कामगिरी केली आहे. तिने क्रमशः चार आणि दोन बळी टिपले आहेत. यादवने आत्तापर्यंत ४१ एकदिवसीय, ५४ टी-20 आणि एक कसोटी सामना खेळले आहे. यामध्ये तिने आत्तापर्यत अनुक्रमे ६३, ७४ आणि तीन बळी टिपले आहेत.

रवींद्र जडेजा
अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा संघाचा नियमित सदस्य नसला तरी त्याने अनेक सामन्यांच्या विजयामध्ये महत्त्वाची भुमिका बजावली आहे. त्याने १५१ वन डे सामन्यांत २०३५ धावा केल्या आहेत आणि १७४ बळी टिपले आहेत.