धोनीच्या ‘बलिदान बॅजला’ परवानगी नाहीच : आयसीसी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर महेंद्रसिंग धोनीला वर्ल्डकप सामन्यामध्ये ‘बलिदान बॅज’ असलेला ग्लोव्होज घालून खेळण्याची परवानगी आयसीसीने नाकारली आहे. आयसीसीने म्हंटले की, नियमानुसार खेळाडूंना कपड्यांवर तसेच खेळाच्या सामानावर कोणतेही व्यक्तिगत संदेश किंवा लोगो लावण्याची परवानगी नाही. यामध्ये विकेटकीपरच्या ग्लोव्होजचा देखील समावेश आहे.

‘बलिदान बॅज’च्या प्रकरणावर बीसीसीआयने धोनीची बाजू घेतली होती. धोनीला ‘बलिदान बॅज’चे ग्लोव्हज वापरण्याची परवानगी आयसीसीने द्यावी, असं बीसीसीआयने म्हटले होते. पण आयसीसीने धोनीच्या ‘बलिदान बॅज’ ग्लोव्हजला साफ नकार दिला आहे. आयसीसीने याबाबत पत्रक जारी केलं आहे.

महेंद्रसिंग धोनीने इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात बलिदान बॅज’चे चिन्ह असलेला ग्लोव्हज वापरला होता. या ग्लोव्हजवर आयसीसीने आक्षेप घेतला होता. यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. सोशलमिडीयावर धोनीच्या समर्थनार्थ #DhoniKeepTheGlove अशा हॅश टॅगची मोहीम देखील सुरु करण्यात आली होती. बीसीसीआयने देखील धोनीला पाठींबा देऊन आयसीसीला पत्र लिहिले होते. अखेर आयसीसीने परवानगी नाकारून या वादाला तूर्तास विराम दिला आहे.