ग्लोव्हज प्रकरणी ‘BCCI’ ची धोनीला ‘बॅकिंग’ ; ‘ICC’ ला लिहिले ‘असे’ पत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने ग्लोव्हज वर बलिदान बॅज चे चिन्ह लावल्यामुळे निर्माण झालेला वाद अजूनही थांबायला तयार नाही. गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) ग्लोव्हजवरील या चिन्हावर आक्षेप घेतला होता. आयसीसीने बीसीसीआयला धोनीच्या ग्लोव्हजवरील चिन्ह काढून टाकायला सांगितले होते. यावरून बीसीसीआयने आयसीसीला पत्र लिहून धोनीच्या ग्लोव्हजवरील चिन्हाचे समर्थन केले आहे.

आम्ही आमच्या खेळाडूच्या बाजूने ठामपणे उभे असल्याचे बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी म्हटले आहे. धोनीच्या ग्लोव्हजवरील मानचिन्ह हे कोणत्या धर्माचे प्रतिक नाही, तसेच ते व्यावसायिक स्वरूपाचे देखील नाही. आयसीसीच्या नियमानुसार, आयसीसीचे कपडे तसेच इतर गोष्टींवर आंतरराष्ट्रीय सामन्याच्या दरम्यान राजकारण, धर्म किंवा अशाप्रकारचे संदेश देणारी चिन्हे नसली पाहिजेत.

बीसीसीआयच्या पत्रावर विचार केला जाईल – आयसीसी

दरम्यान, आयसीसीचे स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन जनरल मॅनेजर क्लेयर फरलॉन्ग यांना याविषयी प्रश्न विचारल्यास त्यांनी म्हटले की, आम्हाला आतापर्यंत बीसीसीआयचे पत्र मिळालेले नाही. पत्र मिळाल्यास यावर विचार केला जाईल. या आधी क्लेयर फरलॉन्ग म्हणाले होते की, ग्लोव्हज वर फक्त निर्माता कंपनीचे नाव पाहिजे. आयसीसीआय कोणत्याही राजकीय आणि धार्मिक चिन्हाचा वापर करण्यास परवानगी देत नाही.