सोशल मीडियाचा वापर करताना सजग रहा : पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम्

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सोशल मीडियाचा वापर करताना त्यावरून आपली माहिती, फोटो अनोळखी व्यक्तींना पाठवू नका. कारण ही माहिती कधीच डिलीट होत नाही आणि त्याचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे मुलींनी अत्यंत सजग रहिले पाहिजे असे पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम् यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या हैदराबादमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त डॉ. के.व्येकटेशम यांनी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींना स्वसुरक्षेबाद्दल मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते.

पोलीस आयुक्तांनी यावेळी पोलिसांकडून चालवण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. पोलिसांकडून ट्रॅक मी सोल्यूशन, दामिनी पथक, बडी कॉप, सेल्फ प्रोटेक्शनचे शिक्षण, पोलीस हेल्पलाईन अशा उपक्रमांची माहिती त्यांनी देऊन या उपक्रमांचा स्वसंरक्षणासाठी उपयोग करावा असे आवाहन पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी उपस्थित विद्यार्थिनी आणि संस्थेतील पदाधिकाऱ्यांना केले.

शहरात 150 पोलीस वाहनांची गस्त
100 या पोलीस हेल्पलाईनच्या कार्यपद्धतीची माहिती आयुक्तांनी दिली. पुणे शहरात 150 पोलीस वाहनांची गस्त सुरु असते. त्यामुळे तुम्ही मदत मागितल्यास लगेच पोलिसांचे वाहन तुमच्या मदतीसाठी 10 मिनीटात पोचू शकते. आत्तापर्यंत अशा पद्धतीने मदत मागितल्यानंतर आम्ही सरासरी 7 मिनीटांत नागरिकांपर्यंत पोहोचलो आहोत. तसेच भविष्यात हा वेळ अजून कमी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगून 100 हा हेल्पलाईन क्रमांक कायम लक्षात ठेवा, असे आयुक्तांनी सांगितले.

यावेळी पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, स्वप्ना गोरे, संस्थेचे सचिव पी. व्ही. शास्त्री, कार्याध्यक्ष प्रमोद गोरे, प्रा. एन. डी. पाटील, संचालिका विद्या देशपांडे यांच्यासह 2000 विद्यार्थिनी आणि संस्थेतील पदाधिकारी उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/