सावधान… तापमान वाढल्याने नागरिकांना करावा लागेल ‘याचा’ सामना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा चढू लागल्याने नागरिकांना उष्मघाताचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वेळेत उपचार घेणे आवश्यक आहे. यादिवसात थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक लागण्याचे प्रमाण कमी होणे, चक्कर येणे, अतिप्रमाणात डोके दुखणे, रक्तदाब वाढणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे. हा आजार उन्हाळ्यात जास्त प्रमाणात होतो. हवेच्या तापमानात वाढ झाली की त्वचेतील छिद्रांद्वारे पाणी बाहेर टाकून शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवले जाते. मात्र काही कारणाने शरीर उत्सर्जित करत असलेल्या उष्णतेचा वेग बाहेरील तापमान शोषून घेण्याच्या वेगापेक्षा कमी झाला की शरीराचे तापमान वाढत जाते. याची वेळेत काळजी घेणे गरजेचे आहे. ती कशी ते जाणून घेऊया.

तापमानात वाढ झाल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ लागते. उन्हाळ्यात तापमान वाढत जाते. सर्वसाधारणपणे शरीराचे तापमान ९८ फॅरनहाइट किंवा ३४ अंश से. असते. हे तापमान १०४ फॅरनहाइट किंवा ४० अंश से. च्या पुढे गेले की शरीरातील अवयवांवर परिणाम होण्यास सुरुवात होते. ही उष्मघाताची लक्षणे आहेत. उष्णता वाढली की शरीर तापते आणि ते पुन्हा थंड होण्यासाठी घाम येतो. हे काम करणारे सेंटर मेंदूमध्ये असते. तापमानाचे नियंत्रण करणारे केंद्रबिंदू शरीरातील पाण्यावर अवलंबून असते. उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होऊ लागले की नियंत्रण करणारे केंद्र बिघडून शरीराचे तापमान योग्य राखले जात नाही. त्यामुळे उष्मघात होण्यास सुरुवात होते. याची सुरुवात व त्याचे उपचार सविस्तर जाणून घ्या.

उष्मघाताची होण्याची सुरुवात
थकवा, चक्कर, निरुत्साही वाटणे, अस्वस्थता येणे ही सुरुवातीची लक्षणे. ही लक्षणे लवकर ओळखून उपाय केले नाहीत तर तीव्र लक्षणे दिसू लागतात. त्वचा कोरडी पडते, जीभ आत ओढली जाते. रक्तदाब वाढतो. मानसिक बैचेनी वाढते, शरीराचे तापमान वाढते. काही वेळा शुद्धही हरपू शकते.

त्याचे उपचार
* उष्माघातामुळे किंवा अति उन्हामुळे चक्कर आल्यास सावलीत जा. मोकळी हवा पोहोचू घ्या.
* ताप वाढत असल्यास गार पाण्याने अंग पुसा. तहान नाही लागली तरी पाणी, यामुळे अनेकदा बरे वाटते.
* उन्हाळ्यात चहा, कॉफी ही पेय शक्यतो टाळा. अतिथंड पाणी, सरबत टाळावे. त्यामुळे पोटात मुरडा पडतो.
* उष्मा वाढला की सतत पाणी पिणे आवश्यक आहे. यावेळी शरीराला ग्लुकोज व क्षारांचा पुरवठा होणे गरजेचे असते. एक ग्लास पाण्यात एक चमचा साखर व चिमूटभर मीठ टाकून केलेले- जलसंजीवनी पेय यासाठी उत्तम असते. मात्र अतिसाखरयुक्त सरबत टाळा.
* हलक्या रंगाचे, सैल व सुती कपडे घाला. उन्हात जाताना गॉगल, टोपी, छत्री वापरा.
* घाम अंगावर सुकू देऊ नका.
* व्यायाम करणे टाळा.
* दुपारच्या वेळेत काम करण्याऐवजी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा बाहेरच्या कामांची आखणी करावी.
* भरपूर पाणी प्या.