सावधान ! तुमच्या न कळत मुलं डेटींग अ‍ॅपच्या आहारी गेलीत का ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – तुमची मुलं तुमच्या नकळत मोबाईलवर वेगवेगळ्या डेटींग अॅपच्या आहारी गेले असतील तर सावधान ! पुण्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डेटींग अॅपवर डेटींगसाठी मुलगी देण्याच्या बदल्यात इयत्ता बारावीत शिकणाऱ्या एका मुलाला वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे भरण्यास लावून त्याला चक्क ३ लाख ६४ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्याने वडीलांच्या नकळत त्यांच्या कार्डवरून हे पैसे भरले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्याने वडीलांसह येऊन चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

१८ वर्षीय तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार तीन मोबाईलधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूल ( नाव बदलले आहे) हा इयत्ता बारावीत शिक्षण घेतो. त्याचे वडील एका कंपनीत नोकरी करतात. त्याने लोकॅन्टो नावाच्या अॅपवर नोंदणी केली. त्यानंतर एका मोबाईलधारकाने त्याला फोन करून डेटींग साईटवर मुलगी देण्यासाठी कार्ड रजिस्टर करण्यास सांगितले. त्यासाठी त्याला वेळोवेळी पैसे भरण्यास सांगितले. त्यानंतर एकूण तीन वेगवेगळ्या क्रमांकांवरून फोन करून त्याला जीएसटी, कार्ड आणि इतर कारणांसाठी पैसे भरण्यास भाग पाडले. त्यासोबतच त्याला एक प्लॅटीनम कार्डही मिळाले. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.

त्याने यासाठी वडीलांच्या खात्याचा वापर करत तब्बल ३ लाख ६४ हजार रुपये भरले. हा प्रकार १७ नोव्हेंबर २०१८ ते २७ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत घडला. त्याने पैसे भरूनही त्याला ना डेटिंगसाठी मुलगी मिळाली, ना पैसे परत मिळाले. हा प्रकार वडीलांच्याही लक्षात आला. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे करत आहेत.