जागतिक सुरक्षा यंत्रणा इंटरपोलने ‘कोरोना’ लसीबद्दल दिला मोठा इशारा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनास प्रतिबंध करण्यासाठी आता अमेरिका, ब्रिटनमध्ये लसीकरणास सुरुवात झाली आहे. त्यातच आता जागतिक सुरक्षा यंत्रणा इंटरपोलने कोरोना लसीबद्दल मोठा इशारा दिला आहे.

इंटरपोलचे सरचिटणीस ज्युर्गेन स्टॉक म्हणाले, कोरोना लसीस संघटित गुन्हेगारी क्षेत्राकडून मोठा धोका उद्भवू शकतो. ते कोरोनाच्या लसीला प्रत्यक्ष अथवा ऑनलाइन माध्यमातून धोका पोहाेचवू शकतात. तसेच हे गुन्हेगार कोरोनास प्रतिबंध करणारी बनावट लस काळ्या बाजारात आणून विकू शकतात, त्यासाठी ते लशीचा मोठा साठा चोरण्याची शक्यता आहे.

अमेरिका, युरोप, रशिया आणि भारत आदी देशांमध्ये लसीकरण आणि वितरणाच्या योजनेवर काम सुरू असून, हे गुन्हेगार कोरोना लशीला लक्ष्य बनवू शकतात. यासाठी खोट्या वेबसाईट, रुग्ण बरे झाल्याचे खोटे दावे अन्यथा इतर प्रकारे कोरोना लशीला इजा पोहाेचवण्याचे काम ते करतील, असेही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, १९४ देश सदस्य असलेल्या इंटरपोलचे मुख्यालय फ्रान्समध्ये आहे. या सर्वच देशांना इंटरपोलने सावधानता बाळगत संघटित गुन्हेगारांना प्रत्युत्तर देण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत.

ब्रिटनमध्ये सामूहिक लसीकरणास सुरुवात

ब्रिटनने फायझर-बायोएन्टेकच्या लशीची निवड केली असून, पुढच्या आठवड्यापासून तिथे सामूहिक लसीकरणास सुरुवात होणार आहे. ब्रिटन हा कोरोनाला प्रतिबंध करणारी लस सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देणारा जगातील पहिला देश ठरला आहे.

फायझर-बायोएन्टेकने अतिशय कठोर निकष लावून कोरोना प्रतिबंधक चाचण्या पार पडल्या आहेत. ही लस ९५ टक्के परिणामकारक आहे. हे लक्षात घेऊनच या लशीला सामूहिक लसीकरणासाठी परवानगी दिल्याचे, ब्रिटन सरकारचे औषध नियंत्रक यंत्रणा एमएचआरएच्या प्रमुख डॉ. जून रेन यांनी म्हटले.