सावधान ! लसीच्या नोंदणीसाठी OTP देताय ? गृहमंत्र्यांनी केलं ‘हे’ आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना लसीकरणाला (Vaccination) शनिवार (दि.17) पासून सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना ही लस देण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व नागरिकांना लस देण्यात येणार आहे. लसीकरण सुरु झाल्यानंतर सायबर चोरटे सक्रीय झाले आहेत. लसीच्या नोंदणीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी राज्यातील नागरिकांना आवाहन केलं आहे. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका आणि कोणालाही ओटीपी देऊ नका असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.

अनिल देशमुख यांनी सांगितले की, राज्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ही लसीकरणाची मोहीम केंद्रीय यंत्रणेकडून जिल्हा यंत्रणेमार्फत राबवली जात आहे. काही सायबर हल्लेखोर नागरिकांना फोन करुन या लसीची नोंदणी करण्यासाठी मोबाइलवर आलेला ओटीपी, आधार क्रमांक, पिन कोड व इतर वैयक्तीक माहिती विचारत आहेत. अशा प्रकारच्या भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये, तसेच आपली कोणतीही वैयक्तीक माहिती सामायिक करु नये, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.

अनिल देशमुख पुढे म्हणाले, अशा प्रकारचे फोन आले तर त्याची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात आणि महाराष्ट्र सायबर विभागामध्ये तक्रार करावी. जेणेकरून पोलीस व सायबर पोलीस हल्लेखोरांवर नियमांनुसार कठोर कारवाई करतील. अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन राज्यातील जनतेला हे आवाहन केले आहे.