कारचालकाची अरेरावी, म्हणाला – ‘कलेक्टर असो अथवा कोणी, काय करायचं ते करा’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी जळगाव रोडवरील आंबेडकर नगर चौकात भर रस्त्यात जिल्हाधिकार्‍यांना कारचालकाने अरेरावीची भाषा वापरली. रस्त्यावर भांडण करून वाहतुकीला अडथळा आणू नका असं सांगणाऱ्या जिल्हाधिकारी सुनील चव्हाण त्यांच्या अंगरक्षक पोलिसाला कार चालकाने धक्काबुक्की केल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी सिडको पोलिसांनी गुन्हा नोंद केली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशांक अशोक वाघ असे आरोपीचे नाव आहे . रविवारी सकाळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे कलाग्राम येथे मतपेट्याची पाहणी करून कार ने कार्यालयाकडे परत जात होते. यावेळी त्यांचा अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर गणपत इंगळे त्यांच्यासोबत होते. आंबेडकर नगर चौकात त्यांच्या कारसमोर रिक्षा आणि कार रस्त्यात उभी होती. दोन्ही वाहनांचे चालक आपापसात हाणामारी करीत होते. यामुळे चालकाने कार उभी केली आणि अंगरक्षक इंगळे हे भांडण सोडवण्यासाठी तिथे गेले.

कारमध्ये जिल्हाधिकारी आहेत रस्‍त्‍यावर भांडू नका, असे त्यांनी दोघांना सांगितलं. असता रिक्षाचालक तिथून निघून गेला तर काय कारचालक शशांक हा इंगळे यांच्यासोबत हुज्जत घालू लागला. एवढेच नव्हे तर त्याने इंगळे यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. हे पाहून जिल्हाधिकारी कारमधून उतरले आणि त्यांनी चालक शशांकला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने “तुम्ही कलेक्टर असो अथवा कोणी तुम्हाला काय करायचे करून घ्या” असं बोलून तो कार घेऊन तिथून निघून गेला. या घटनेनंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अंगरक्षक इंगळे यांनी सिडको पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.

आरोपी शशांक हा आरटीओ अधिकाऱ्याचा तरुण मुलगा आहे. तो उस्मानपुरा परिसरात व्यायाम शाळा चालवतो. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर सिडको निरीक्षक अशोक गिरी आणि अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी तत्काळ आरोपीला त्यांच्या घरातून अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.