मराठी भाषेचा अभिमान बाळगावा : प्रा.विजय अंधारे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   मराठी भाषेला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. मराठी ही आपली मातृभाषा आहे. मराठी भाषेचे संवर्धन करणे आणि मराठी भाषा टिकवणे ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येक मराठी भाषिकाने मराठी भाषेचा अभिमान बाळगलाच पाहिजे, असे मत भारतीय जैन संघटना संस्थेचे प्रा. विजय अंधारे यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयात जागतिक मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य विजय शितोळे, पर्यवेक्षक प्रल्हाद पवार, शिवाजी मोहिते, दिलीप क्षीरसागर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी रूपाली सोनावळे यांनी मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषेचे संवर्धन, मराठीची सद्यस्थिती, मराठी भाषेचे सौंदर्य याविषयी मार्गदर्शन केले. भानुदास पाटोळे यांनी विज्ञानगीत सादर केले. कवयित्री अश्विनी सावंत यांनी स्वरचित कविता सादर केली. तृप्ती पाटील यांनी विज्ञानदिनाची माहिती दिली. यानिमित्ताने मराठी साहित्यिक पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन ग्रंथपाल प्रदीप बागल यांनी केले होते.

साहित्यिक वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. वैज्ञानिक सी. व्ही. रमन यांच्या रमन इफेक्टस या शोध प्रित्यर्थ 28 फेब्रुवारी विज्ञान दिन साजरा करण्यात येतो.

संगीता रूपनवर व सारिका टिळेकर यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक दिलीप क्षीरसागर यांनी आभार मानले.