जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पाण्याच्या टाकीत दारू मिसळल्याचा संशय 

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – भंडारा जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ बियरची बाटली आणि ग्लास  आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात  खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. लवकरच तपास करून आरोपीवर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
मोहाडी तालुक्यातील सुकळी गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून शाळेची  पटसंख्या २२० आहे. या शाळेत पिण्याच्या पाण्यातून वास येत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडे केली. शिक्षकांनी छतावर असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये काय पडले आहे काय, याचा शोध घेतला. त्यावेळी त्यांना या टाकीच्याजवळ बियरची एक रिकामी बाटली आणि ३ ग्लास दिसून आले. त्यामुळे अज्ञात मद्यपीने टाकीजवळ बसून दारू घेतली असावी आणि त्यानंतर उरलेली ही बियर टाकीत घातली असावी, असा संशय शिक्षकांना आला. मुख्याध्यापकांनी याविषयी गावकऱ्यांना माहिती दिली.
सुरुवातीला गावकऱ्यांनी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार कोणी केला हे समजू न शकल्याने त्यांनी याची तक्रार मोहाडी पोलीस ठाण्यात दिली. तक्रार मिळतात पोलीस उपनिरीक्षक बी. के. थेरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन संपूर्ण परिसराची चौकशी केली. त्यावेळी त्यांना ही बिअरची बाटली आणि दारू पिण्यासाठी उपयोग केलेले ३ ग्लास आढळून आले. बाटली आणि ग्लास ताब्यात घेऊन त्यांनी चौकशी सुरू केली आहे. लवकरच या टवाळखोर मद्यपी लोकांना अटक करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. शाळेच्या परिसरात अशा पद्धतीचे चुकीचे काम कोणीही करू नये, अशी विनंती मुख्याध्यापकांनी यावेळी केली. या घटनांचा प्रभाव या लहान मुलांच्या मानसिकतेवर होतो. ज्याने कोणी हे काम केले असेल त्याला मोठी शिक्षा व्हावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
Loading...
You might also like