अहमदनगर : माळीवाडा बसस्थानकातच चालकास मारहाण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – गाडीला कट मारल्याच्या रागातून दुचाकीवरील एका व्यक्तीच्या मुलाने एसटी बसच्या चालकास कायनेटीक चौक व माळीवाडा बस स्थानकात बेदम मारहाण केली. तक्रार करण्यासाठी चालक पोलिसांकडे जात असतानाही मारहाण केली. आज दुपारी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.


याबाबत समजलेली माहिती अशी की, पारनेर येथून नाशिककडे जाणाऱ्या एसटी बस चालकाचा दुचाकीला कट बसल्यावरुन एका वाहन चालकासोबत वाद झाले. दोघांमध्ये कायनेटीक चौकात शाब्दिक चकमक झाली. त्यावेळी दुचाकीस्वाराचा मुलगा तेथे आला. त्याने चालकास मारहाण केली.

मारहाण केल्यानंतर चालक एसटी बस घेऊन चालक माळीवाडा स्थानकात आला. माळीवाडा स्थानकातही दुचाकी चालकाची सर्वांसमोर धुलाई सुरू केली. इतर चालक व वाहकांनी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. मारहाणीनंतर चालक तक्रार देण्यासाठी पोलिस चौकीकडे जात असताना तेथेही चालकास मारहाण करण्यात आली. वारंवार झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.