वाहन परवाना मागितल्याच्या कारणावरून पोलिसांना बेदम मारहाण

पुणे/मोरगाव : पोलीसनामा ऑनलाइन – वाहन परवाना मागितल्याच्या रागातून पोलीस कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना बारामती तालुक्यातील मोरगाव येथील मुख्य चौकात घडली. हा प्रकार बुधवारी रात्री दोन ते अडीच्या सुमारास घडला. याप्रकरणी एका महिलेसह चौघांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी रात्री वडगाव निंबाळकर पोलिसांकडून नाकाबंदी करण्याचे काम सुरु होते. त्यावेळी मुख्य चौकामध्ये सुपा बाजुने येणारी स्कॉर्पिओ (एमएच १६ बीएच ९३८०) गाडी आली. नाकाबंदीवर तैनात असलेल्या पोलीस वाहनाची तपासणी करत होते. त्यावेळी पाठिमागून आलेल्या इटीर्गी कार (एमएच १६ एम ४१४१) आली. पोलीस नाईक प्रदीप काळे यांनी वाहन चालकाकडे परवाना मागितला. त्यावेळी कारमधील एका महिलेसह चौघांनी प्रदीप काळे यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. कारमधील एकाने काळे यांच्या छातीत लाथ मारून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा प्रकार सुरु असताना पोलीस नाईक काशिनाथ नागराळे हे त्या ठिकाणी आले असता त्यांना देखील शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.

याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात दोन्ही गाड्यामधील दादासाहेब पोपटराव कासार, शिवाजी लोखंडे, वंदना कासार, अक्षय बेल्हेकर (सर्व रा. वाळकी, ता.जि. अहमनदनगर) यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –