भुशी धरणावर ‘हुल्लड’बाजांकडून पोलिसाला ‘बेदम’ मारहाण !

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाईन – भुशी धरणावर हुल्लडबाजी करणाऱ्यांना रागावल्याचा राग मनात धरून धरणावरून परतणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला बेदम मारहाण केली. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. ही घटना आज (गुरुवार) सांयकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या घटनेत पोलीस कॉन्स्टेबल सुभाष दत्तु शिंदे यांच्या डोक्याला मार लागला आहे.

सुभाष शिंदे यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी राहुल लालासाहेब कदम (वय ३०), राहुल दिलीप गुणवरे (वय ३०), अतुल अंबादास गुणवरे (वय ३०), पवन शिवाजी गुणवरे (वय २८), दत्तात्रय कुंडलिक गुणवरे (वय २८ सर्व राहणार स्वामी चिंचोली, गुणवरे वस्ती, दौंड पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील पाच युवक आज लोणावळा येथे फिरण्यासाठी आले होते. दुपारी दारू पिऊन भुशी धरणावर आले. धरणावर आल्यापासून ते हुल्लडबाजी करत होते. धरणावर तैनात असलेल्या शिंदे यांनी त्यांना समज दिला. त्यानंतरही त्याचा दंगा सुरु होता. धरणाच्या पायऱ्यावर बसून ते एकमकांची पँट ओढत गोंधळ घालत होते. त्यावेळी त्यांना तेथून हकलून देण्यात आले. सायंकाळी सहाच्या सुमारास धरणावरील पर्यटकांना बाहेर काढून शिंदे पोलीस ठाण्याकडे जात होते. त्यावेळी आरोपींनी संगनमत करून शिंदे यांना वेढा घालत बेदम मारहाण केली. पोलिसाला मारहाण होत असल्याचे पाहून ग्रामस्थांनी मध्यस्थी करून शिंदे यांची सुटका केली. तर दोघांना पकडून ठेवले. ग्रामस्थांचा रोष पाहून इतर तिघांनी तेथून पलायन केले. पोलिसांनी फरार आरोपींना शोधून काढत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like