Chakan News : दोन गटातील भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण, एकावर खुनी हल्ला, तिघांना अटक

चाकण/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दोन गटात सुरु असलेली भांडणं सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसाला मराहण केल्याची घटना चाकण येथे घडली आहे. यामध्ये पोलिसाच्या हाताला दुखापत झाली असून एका गटातील व्यक्तीवर खुनी हल्ला करण्यात आला. ही घटना चाकण येथील माणिक चौकात शनिवारी (दि.23) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

याप्रकरणी दोन्ही गटातील 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. संदिप अरुण शिंदे (वय-43), हर्शल संदिप शिंदे (वय-21 दोघे रा. मेदनकरवाडी), ओंकार मनोज बिसणारे (वय-20) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अभि सुखदेव घोडके, पराग गायकवाड, सिद्धार्थ माने, प्रतिक जाधव, निखिल उर्फ दाद्या कांबळे, विवेक कुऱ्हाडे, नामदेव नाईक, प्रणव शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई अनिल मारुती कारोटे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आरोपींमध्ये भांडण सुरु होते. दोन्ही गटातील लोक काठ्या, गज, दगडाने एकमेकांना मारहाण करत होते. ही भांडणे सोडवण्यासाठी पोलीस शिपाई कारोटे आणि त्यांचे सहकारी पोलीस गेले. दोन गटातील भांडण सोडवत असताना आरोपींनी पोलीस शिपाई कारोटे यांना धक्काबुक्की केली. यामध्ये त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. तर आरोपी निखिल उर्फ दाद्या कांबळे याच्या डोक्यात मारुन आरोपींनी खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपींवर खुनाचा प्रयत्न आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.