‘केस’ मागे घेत नसल्याने मामेसासऱ्यास बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कौटुंबिक वादातून न्यायालयात सुरू असलेली केस पत्नी मागे घेत नाही, या कारणावरून चिडून जाऊन भाचेजावयाने आपल्या ७ ते ८ साथीदारांसमवेत मामेसासऱ्याच्या घरी जाऊन पती-पत्नीस लाथा-बुक्क्या व गजाने मारहाण केली असल्याची घटना उरुळी देवाची येथे घडली आहे. याप्रकरणी दीपक महादेव गुंजाळ (वय ३२, खंडोबाचा माळ, उरुळी देवाची, ता. हवेली, मूळ रा. रामवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. यावरुन सतीश धोत्रे व त्यांच्या ७ ते ८ साथीदारांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंजाळ यांची मावसभाची राधिका व तिचा पती संतोष धोत्रे या दोघांची प्रापंचिक वादावरून न्यायालयात केस चालू आहे. ती मागे घ्यावी म्हणून धोत्रे गुंजाळ यांना वारंवार धमकी देत होता. परंतु त्यांनी त्याला यात माझा काही सहभाग नाही, असे सांगितले होते. यावेळी झालेल्या झटापटीत तिच्या गळ्यातील सोन्याचा दागिना तुटून पडला. यावेळी गुंजाळ त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना त्यातील एकाने त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून घेऊन जमिनीवर आपटून त्याचे नुकसान केले. त्यानंतर ते सर्व जण शिवीगाळ करीत निघून गेले. दवाखान्यातून उपचार घेऊन आल्यानंतर गुंजाळ यांनी उरुळी देवाची दूरक्षेत्रात जाऊन तक्रार दाखल केली.

गुंजाळ हे बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरासमोर थांबले होते. त्यावेळी एक चारचाकी गाडी  त्यांच्याजवळ आली व त्यातून संतोष धोत्रे व त्याचे ७ ते ८ सहकारी खाली उतरले व धोत्रे गुंजाळ यांना तुझ्या भाचीला केस मागे घ्यायला सांग नाही तर तुला आताच ठोकतो, असे म्हणाला. यावर ते त्याला यात माझा काही सहभाग नाही तू आणि तुझी पत्नी काय असेल ते पाहून घ्या.

याचा धोत्रे यास राग आल्याने त्याने शिवीगाळ करीत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली, हे पाहून त्याच्यासोबत आलेल्या साथीदारांनीही हाताने व तेथे पडलेल्या दगडांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने लोखंडी गजाने त्यांचे हात, पाय व डाव्या पायाच्या नडगीवर मारले. त्यामुळे ते ओरडले, हे ऐकून त्यांची पत्नी शैला तेथे आली. तिलाही शिवीगाळ व मारहाण करण्यात आली.