पुण्यात लॉकडाऊनमध्ये अपॉइंटमेंट घेऊन ग्राहकांना ब्युटीपार्लरची सुविधा, गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुण्यातील उच्चभ्रू भागात लॉकडाऊन काळात देखील अपॉइंटमेंट घेऊन ग्राहकांना सेवा देणाऱ्या ब्युटी पार्लरवर गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. चालक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानसी बाळकृष्ण डोगरा (वय 35, रा. रो हाऊस, नॉर्थ अव्हेन्यू रोड, कल्यानीनगर) चालक महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आस्थापना बंद होत्या. आता 1 जून पासून काही आस्थापना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मॉल, सलून, ब्युटीपार्लर, शाळा, कॉलेज अश्या काही आस्थापना बंदच ठेवण्यात आल्या आहेत.

परंतु अश्या काळात देखील उच्चभ्रू परिसर असणाऱ्या कल्याणीनगर ब्युटीपार्लर सुरू होते. दरम्यान गुन्हे शाखा युनिट चारचे पथक या परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी मानसी डोगरा ही महिला ब्युटीपार्लर चालवत आहे. तसेच ती अपॉइंटमेंट घेऊन ग्राहकांना सेवा देत आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चारचे वरिष्ठ निरीक्षक अंजुम बागवान, सहायक निरीक्षक गणेश पवार कर्मचारी राजू मचे, रमेश राठोड, सागर घोरपडे यांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकला असता चालक मानसी ही एका महिलेचे फेसपॅक करीत असताना मिळून आली. तिला विचारले असता तिने व्हाट्सअप आणि फोनद्वारे अपॉइंटमेंट घेऊन सेवा देत असल्याचे कबूल केले. त्यानुसार ताब्यात घेऊन कारवाई केली.